कोल्हापूर : जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे अखेर आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ६९८४ शेतकऱ्यांना १८ कोटी १ लाख ६६ हजर ३०९ रुपये मिळणार असून दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे जमा होणार आहेत.गेली दोन वर्षे पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. जुलै, ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टी, महापुराने जिल्ह्यातील ७४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. ज्यांचे दोन लाखांपर्यंत पीक कर्ज आहे, त्यांची कर्जमाफी तर बिगर कर्जदारांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार यातील ९६ हजार ६६३ शेतकऱ्यांना २९४ कोटींची भरपाई मिळाली. मात्र, पंचनामा चुकीचा, बँक खातेक्रमांक चुकीचा यासह काही तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील ६९८४ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते.
या शेतकऱ्यांचे पुर्नलेखापरीक्षण करून ही यादी शासनाकडे पाठविली होती. मात्र, कोरोनामुळे निधीच उपलब्ध होत नव्हता. नुकसान होऊन वर्ष उलटले तरी पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळाले नाही. उसनवारी करून शेतकऱ्यांनी खरीप हंगाम घेतला. शासनाने पावसाळी अधिवेशनात राज्यातील ७५ कोटी २१ लाख रुपये निधीस मान्यता दिली. त्यानंतर जिल्ह्यासाठी १८ कोटी १ लाख ६६ हजार ३०९ रूपये मिळाले आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर साधारणत: दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत.
महापुरातील कर्जमाफीचे पैसे प्रलंबित होते. ते आले असून साधारणत: दोन-तीन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होतील.- अमर शिंदे ,जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर