कोल्हापूर : महापुरात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. यामध्ये सर्वाधिक जिल्हा बॅँकेशी संलग्न शेतकरी असून, याद्यांचे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या हालचाली शासकीय यंत्रणेच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत.जूलै-आॅगस्ट महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व महापूराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. महापुराने ७८ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये तीन लाख सात हजार शेतकऱ्यांचे १२९९ कोटी ६५ लाखांचे नुकसान झाले.
एक हेक्टरच्या आतील पूरबाधित शेतकऱ्यांना सरकारकडून मदत देण्याची घोषणा करण्यात आली. कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी (प्रतिगुंठा ९५० रुपयांप्रमाणे) केली जाणार असून, ज्यांनी कर्ज घेतलेले नाही, त्यांना प्रतिगुंठा ४०५ रुपये भरपाई मिळणार आहे. यासाठी राज्य आपत्ती निवारण मदतनिधीतून ६३० कोटी २० लाख, तर केंद्रीय आपत्ती निवारण मदत निधीतून १०५ कोटी ४४ लाख रुपये मिळणार आहेत.पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या याद्या कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.
कर्जदार आणि बिगर कर्जदारांच्या याद्या वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, साधारणत: आठ दिवसांत कर्जमाफीचे पैसे संबंधितांच्या खात्यावर जमा करायचे, असे प्रयत्न सरकार यंत्रणेकडून सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे मदतीच्या कामाला काहीसा ब्रेक लागला होता; पण आता या कामाला थोडी गती आली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक पीक कर्जाचा पुरवठा जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून होतो. त्यामुळे कर्जमाफीमध्ये सर्वाधिक लाभार्थी हे जिल्हा बॅँकेचे असून, सुमारे ९२ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रयीकृत बॅँकांच्या आठ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.सर्वाधिक नुकसान ऊस उत्पादकांचेमहापुराचा सर्वाधिक फटका हा ऊस उत्पादकांना बसला असून, ६१ हजार ९९९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. भाताचे आठ हजार ४६६, तर २६७२ हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.
याद्यांचे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाकडे पाठविली जाईल, त्यानंतर पैसे खात्यावर वर्ग केले जाणार आहेत.- अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक