कोल्हापूर : अनेक दशकांच्या खंडानंतर ते एकमेकांना भेटले. प्रत्येक जण एकमेकाला अंदाजानेच हाक मारत होता. कुणाचे केस पांढरे झाले होते तर कुणाच्या डोक्यावर पूर्णपणे टक्कल पडले होते. स्वतः आजी-आजोबा तर काहीजण आई-बाबा झाल्यानंतरही आपल्या शाळेतील मित्र-मैत्रिणींना आणि शिक्षकांना पाहून आनंदून जात होते. निमित्त होते शिक्षण मंडळ कराड या संस्थेच्या कोल्हापुरातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे.
शिक्षण मंडळ कऱ्हाड या संस्थेचे २०२०-२०२१ हे शताब्दी वर्ष. यानिमित्त संस्थेच्या अनेक माजी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी विभागवार मेळावे आयोजित केले आहेत. त्यातील पहिला मेळावा कोल्हापूर येथे शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात रविवारी (दि.१०) पार पडला. या कार्यक्रमाचे निमंत्रक होते. योगीता पाटील, पल्लवी कुलकर्णी, मेधा कुलकर्णी, विनय तोडकर आणि ज्ञानेश्वर भिसे हे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी.
रांगोळी, सनईचे सूर आणि मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी या भारलेल्या वातावरणातच स्वप्ना, योगिता आणि मेधा यानी शाळेची प्रार्थना म्हणून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. सरस्वती वंदनेबरोबरच पल्लवी कुलकर्णी यांनी कॅनव्हासवर ॲक्रेलिक कलरने देवीचे पेंटिंग्ज रेखाटले. माजी विद्यार्थी/ विद्यार्थिनींनी ते संस्थेस भेट दिले. नलिनी जुगारे व ज्ञानेश्वर भिसे यानी तत्कालीन शिक्षकांच्या आठवणी जागविल्या.
शताब्दी महोत्सवाचे समन्वयक राजेंद्र लाटकर यानी संस्थेच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली व शताब्दी महोत्सवाच्या पुढील कार्यासाठी दिशादर्शन केले.
विद्यार्थिनीप्रिय शिक्षिका अनघा परांडकर मॅडम यानीही मार्गदर्शनपर भाषण केले. यानंतर अध्यक्ष सदानंद चिंगळे यानी संस्थेच्या पुढील विस्तारासंबंधी माहिती दिली. तृप्ती पालेकर (कुलकर्णी) व ज्ञानेश्वर भिसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेधा कुलकर्णी यानी सर्वांचे आभार मानले तसेच सर्व माजी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांकडून संस्थेला पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.