कोल्हापूर : महापालिका प्रशासनाने हद्दवाढीबाबतचा प्रस्ताव पाठविण्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा महापालिकेशी संघर्ष अटळ आहे. दहा दिवसांनंतर निर्णय झाला नाही तर महापालिकेच्या कामकाजात अडथळा आणू, असा इशारा सर्वपक्षीय हद्दवाढ समर्थक कृती समितीचे निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार यांनी दिला आहे. हद्दवाढीसंदर्भातील आंदोलनाची पुढील दिशाबाबत विचारले असता त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हद्दवाढीबाबत फेरप्रस्ताव पाठविण्याची सूचना केली आहे. मात्र, महापालिकेची मुदत संपली असल्यास निवडणूक होत नाही तोपर्यंत तेथील क्षेत्र बदल करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आहेत.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी याचा दाखला देत कायदेशीर बाबी तपासून पुढील निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. हद्दवाढ समर्थक कृती समितीच्यावतीने यासंदर्भात १० दिवसांत महापालिकेने स्पष्टोक्ती करावे, असे म्हटले आहे.प्रशासक डॉ. बलकवडे यांची १० दिवसांनी भेट घेऊन प्रस्ताव पाठविण्याबाबत पुन्हा मागणी केली जाईल, तरीही प्रस्ताव पाठविला गेला नाही तर मात्र, आरपारची लढाई सुरू करावी लागेल. यामध्ये मोर्चा, रास्ता रोको, उपोषण करणार नसून महापालिकेच्या कामात अडथळा आणला जाईल, असे आंदोलन केले जाईल, असे आर. के. पोवार यांनी सांगितले.