कोल्हापूर : कामकाजाचा लेखाजोखा पाहूनच महाराष्ट्र ज्ञान महामंडळासमवेतचा (एमकेसीएल) शिवाजी विद्यापीठाचा करार कायम करायचा अथवा नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनातर्फे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुक्रवारी केले.विद्यापीठाच्या अधिसभेत ‘सुटा’ सदस्य डॉ. एस. ए. बोजगर यांनी विद्यापीठाचा सक्षम आणि स्वतंत्र संगणक विभाग असताना परीक्षाविषयक कामकाज ‘एमकेसीएल’कडे देण्याचे कारण काय?, विद्यापीठाने त्यांच्याशी आणखी किती वर्षांचा करार केला आहे, असा प्रश्न उपस्थित केला. अनिल घाटगे यांनी परीक्षा विभागातील गोंधळाचे प्रमुख कारण ‘एमकेसीएल’ असून, ते लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने कार्यरत राहावे. त्यामुळे विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना सध्या होणारा त्रास कमी होईल, असे सांगितले. त्यावर प्रशासनातर्फे डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठासमवेत ‘एमकेसीएल’चा करार पूर्वीपासून एक वर्षाचा आहे. मात्र, सध्या परीक्षाविषयक कामकाजात निर्माण झालेला गोंधळ पाहता व्यवस्थापन परिषदेने ‘एमकेसीएल’च्या कामकाजाचा आढावा, लेखाजोखा घेण्याचे ठरविले आहे. तो पाहूनच ‘एमकेसीएल’च्या कराराबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)कर चुकविलेला नाहीएलबीटी, व्हॅट अशा स्वरूपातील कोणताही कर विद्यापीठाने चुकविलेला नसल्याचे डॉ. शिर्के यांनी सांगितले. ते म्हणाले, अकौंट कोडमुळे विद्यापीठाच्या अंदाजपत्रकातील काही पाने रिकामी दिसतात. ती पुढील तरतुदींसाठी ठेवली आहेत. प्रयत्न केल्यास सुधारित अंदाजपत्रक मार्चऐवजी फेब्रुवारीत मांडता येईल.
‘एमकेसीएल’बाबत लेखाजोखा पाहूनच निर्णय : डी. टी. शिर्के
By admin | Published: March 27, 2015 10:39 PM