कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील २४ प्राथमिक शाळा बंद करून त्या अन्य शाळांमध्ये समायोजित करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. १० पटसंख्येपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ शाळा समायोजित करण्याबाबत शिक्षण संचालकांनी निर्देश दिले होते.
या निर्णयानुसार जिल्ह्यातील २४ शाळा बंद करून त्या लगतच्या शाळांमध्ये समायोजित करण्याचे आदेश दिले आहेत. बंद करावयाच्या शाळांतील शालेय अभिलेखे, भौतिक साहित्य व शाळेतील शिक्षक लगतच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहेत. मात्र, ३४ पैकी १० शाळा या प्रतिकूल ठिकाणी आहेत. तेथून विद्यार्थ्यांना दुसरीकडे जाता येणार नाही; म्हणून त्या बंद करू नयेत, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
या शाळांचे एकत्रीकरणकुमार व कन्या कोथळी (ता. शिरोळ ), सोनाळी (ता. भुदरगड) कन्या शिरोली नं. २ व ४ ता. (हातकणंगले ), कन्या वडगाव व शारदा वडगाव, (ता. हातकणंगले ), कुमार वाकरे व कन्या वाकरे, (ता. करवीर) या शाळांचे एकत्रीकरण करण्याचाही निर्णय घेतला आहे.