कोल्हापूर : ‘मिनी लॉकडाऊन’बाबत जिल्हा प्रशासनाच्या सूचना मिळाल्यानंतर त्याबाबत मालक, प्रशिक्षक यांची बैठक घेऊन जीम (व्यायामशाळा) बंद ठेवण्याबाबतचा निर्णय कोल्हापूरमध्ये होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ५० टक्के उपस्थितीनुसार जीम सुरू आहेत.
कोरोनामुळे गेल्यावर्षी सात महिने जीम बंद राहिल्या. त्यावेळी जीम मालक, प्रशिक्षकांनी वारंवार निवेदने देऊन मागणी केल्यानंतर मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर जिल्हा प्रशासनाने दिनांक २५ ऑक्टोबरपासून जीम सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार दसऱ्याच्या मुहूर्तावर जीम सुरू करण्यात आल्या. सोशल डिस्टन्सिंग, ५० टक्के उपस्थिती, सॅनिटायझर डिस्पेंन्सर, थर्मल स्क्रीनिंग, मास्कचा वापर, आदी नियमांचे पालन करून गेल्या सहा महिन्यांपासून नागरिक, तरूणाई जीममध्ये जावून व्यायाम करत आहे. त्यांची संख्या जानेवारीपासून वाढू लागली. मात्र, आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मिनी लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. त्यामुळे पुन्हा जीम बंद ठेवाव्या लागणार आहेत. मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्याप मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश जीम सुरू आहेत. दरम्यान, मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतर बैठक घेऊन जीम बंदबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे महाराष्ट्र जीम ओनर्स असोसिएशनचे कोल्हापूर समन्वयक युवराज कुंभार यांनी सोमवारी सांगितले. दरम्यान, काही जीम सोमवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या.
चौकट
जीम सुरू राहाव्यात
डिसेंबरपासून जीम व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला होता. आता पुन्हा जीम बंद झाल्यास त्याचा फटका बसणार आहे. लॉकडाऊन असलेल्या परदेशामध्ये जीम सुरू ठेवल्या आहेत. जीमचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला आहे. सध्या सोशल डिस्टन्सिंगसह ५० टक्के उपस्थितीच्या नियमांचे आम्ही पालन करत आहोत. त्यामुळे जीम सुरू राहाव्यात, अशी आमची मागणी असल्याचे कुंभार यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून गेल्या सहा महिन्यांपासून जीम सुरू आहेत. आता शासनाच्या नियमानुसार जीम बंद करण्याची कार्यवाही केली आहे.
- तुषार नसलापुरे, संचालक, गोल्ड जीम, कोल्हापूर.
जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
जीमची एकूण संख्या : ७२५
जीममध्ये व्यायाम करणाऱ्यांची संख्या : सुमारे दीड लाख
प्रशिक्षक, साफसफाईचे काम करणाऱ्यांची संख्या : ७ हजार