कोल्हापूर : आंतरराज्य सीमांना जोडणारा कोणताही रस्ता एखाद्या राज्याला स्वत:च्या अधिकारात अचानक बंद करता येत नाही. कोविड प्रमाणपत्रासाठी कर्नाटक सरकारने केलेली कृती त्यामुळेच बेकायदेशीर ठरत असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.कर्नाटकात तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढू लागल्यावर कर्नाटकने कोगनोळी नाक्यावर अचानक तपासणी नाका उभा करून ज्यांचे कोरोना प्रमाणपत्र निगेटिव्ह न आल्यास त्यास कर्नाटक हद्दीत प्रवेश देणेच बंद केले आहे. त्याचा लोकांना, पर्यटकांनाही मोठा त्रास होत आहे.
कर्नाटकात जाणारी व्यक्ती फक्त त्या राज्यातच जाते असे नाही. त्या राज्यातून गोव्यापासून केरळपर्यंत पर्यटनासाठी जाणारा मोठा वर्ग आहे. अशा सगळ्याच लोकांना त्याचा त्रास होत आहे. एखाद्या राज्याला परस्पर दुसऱ्या राज्यातून येणारा रस्ता असा बंद करण्याचे अधिकारच नाहीत. हा अधिकार फक्त केंद्र शासनालाच आहेत. हा तर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि कर्नाटकने तो सगळे नियम धाब्यावर बसवून अडवून ठेवला आहे.
कर्नाटक सरकारने कोगनोळी नाक्यावर चेकपोस्ट उभारून लोकांची कोविड तपासणी सुरू केली आहे. त्याबाबत महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनाही सोमवारी पत्र लिहून कळविण्यात आले आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन मागविले आहे.-दौलत देसाईजिल्हाधिकारीकोल्हापूर.