आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १३ : शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील व अन्य दोन संचालकांच्या अपात्रतेबाबत सोमवारी (दि. १९) जिल्हा उपनिबंधकांसमोर अंतिम सुनावणी होणार आहे. मंगळवारी याबाबत सुनावणी होती; पण संबधितांना म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात आली.
शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, संचालक एम. एम. पाटील व मानसिंग पाटील यांनी भूविकास बॅँकेकडून विविध कारणांसाठी उचललेले कर्ज थकीत आहे. सहकार कायद्यानुसार एखाद्या संस्थेचा संचालक दुसऱ्या संस्थेचा थकबाकीदार असेल तर तो अपात्र ठरतो. त्यानुसार या तिघांवर कारवाई करावी, अशी मागणी सुरेशराव देसाई यांनी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी संबंधितांना लेखी म्हणणे सादर करण्याबाबत नोटिसा लागू केल्या होत्या.
त्यांनी वकिलांमार्फत म्हणणे सादर केले. नैसर्गिक न्यायाप्रमाणे निर्णय घेण्याअगोदर म्हणणे सादर करण्यासाठी संधी द्यावी लागते. त्यानुसार आतापर्यंत चार सुनावण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये संचालक, तक्रारदार व भूविकास बॅँकेचे म्हणणे घेतले आहे. यावर अंतिम निर्णय सोमवारी (दि. १९) घेतला जाणार आहे.
दरम्यान, एम. एम. पाटील व मानसिंग पाटील यांनी कारवाईच्या भीतीने सोमवार (दि. १२) च्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामे सादर केले आहेत. संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी हे राजीनामे मंजूर केले असून, याबाबतची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला सादर केली आहे. त्यामुळे नेमकी कारवाई कशी होणार, याबाबत उत्सुकता लागली आहे.