कोल्हापूर : राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी कृषी पंपांच्या जोडणीसाठी पैसे भरले आहेत. मात्र एक एप्रिल २०१८ पासून त्यांना शेतीपंपासाठी प्रतीक्षा करावी लागत असून, या शेतकऱ्यांना तातडीने वीज कनेक्शन जोडण्या द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांनी केली होती. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने जोडण्या देण्याचा निर्णय घेतला असून आमदार पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
मार्च २०१८ पूर्वी पैसे भरलेल्या ग्राहकांना वीज कनेक्शन दिले जात होते. मात्र १ एप्रिल २०१८ नंतर ज्या ग्राहकांनी पैसे भरले, अशा ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. संबंधित रोहित्रावर विजेचा भार शिल्लक असला तरी, कनेक्शन मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विधिमंडळ अधिवेशनात आमदार पाटील यांनी याबाबत प्रश्न मांडला होता, मात्र अधिवेशन दोनच दिवस चालले. त्यामुळे त्यांनी ऊर्जामंत्री राऊत यांना भेटून या बाबीची माहिती दिली व प्रलंबित वीज कनेक्शन तातडीने देण्याची मागणी केली. त्यांनी सचिवांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत शासन पातळीवर निर्णय घेऊन, ज्या रोहित्रावर भार शिल्लक आहे, तेथील कनेक्शन्स जोडण्याबाबत आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे आमदार पाटील यांच्या पाठपुराव्याला यश येऊन राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.