कोल्हापूर : सीमाप्रश्नी गेले वर्षभर सर्वोच्च न्यायालयामध्ये फारसे कामकाज झाले नाही. तेव्हा याबाबत लक्ष घालण्याची विनंती सीमाभागातील नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे गुरुवारी केली. यावर मुंबई आणि दिल्ली येथे बैठक घेण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.
सीमाभागातील नेते दीपक दळवी, राजाभाऊ पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, मालोजी अष्टेकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगळे हे सर्वजण दुपारीच विश्रामगृहावर आले होते. त्यावेळी पवार यांनी त्यांना दुपारी भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार या मंडळींनी त्यांची भेट घेतली.
अॅड. हरीश साळवे हे बहुतांशी वेळ विदेशात असल्याने गेल्या वर्षभरामध्ये या खटल्याचे कामकाज फारसे चालले नाही. तेव्हा आपण याबाबत लक्ष घाला, अशी विनंती पवार यांना करण्यात आली. तेव्हा मुंबईत आणि दिल्लीत याबाबत बैठक घेऊ. प्रत्यक्ष चर्चा करू, असे पवार यांनी सांगितले.
तसेच १0 डिसेंबर रोजी बेळगाव येथे होणाऱ्या कर्नाटकच्या अधिवेशनावेळी मराठी बांधवही प्रतिअधिवेशन घेतात. या अधिवेशनासाठी पवार यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जाण्याच्या सूचना केल्या. नऊ डिसेंबर रोजी मुंडे जत येथे आहेत. तेथून बेळगावला त्यांना कार्यक्रमासाठी नेण्याची जबाबदारी आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली.सीमाभागातील नेत्यांनी गुरुवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राजाभाऊ पाटील, मालोजी अष्टेकर, अरविंद पाटील, दीपक दळवी, धनंजय महाडिक, ए. वाय. पाटील उपस्थित होते.