यड्राव : राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीबाबत त्रिपक्षीय समितीच्या मुंबई येथे आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीतील चर्चेनुसार २६ फेब्रुवारीला साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय? होण्याची शक्यता आहे. ही बैठक समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
साखर कामगार वेतन कराराची मुदत ३१ मार्च २०१९ रोजी संपली आहे. पगारवाढीसाठी विलंब होत असल्याने व मागणीकडे शासन लक्ष देत नसल्याने महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने राज्यव्यापी साखर कारखाने बेमुदत संप जाहीर केला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये शासनाने जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय समिती स्थापन केली.
समितीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत साखर कामगारांच्या वेतनवाढीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये साखर कामगार कामगारांना ४० टक्के पगारवाढीची मागणी तसेच अंतरिम पगारवाढीऐवजी अंतिम पगारवाढ द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या दोन्ही मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार २६ फेब्रुवारीला पुन्हा बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. या बैठकीत पगारवाढीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बैठकीत साखर कामगार आयुक्त शेखर गायकवाड, कामगार उपायुक्त रवीराज इळवे, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले, रावसाहेब पाटील, अविनाश आपटे, रावसाहेब भोसले, सुरेश मोहिते, अशोक बिराजदार, योगेश हंबीर व प्रदीप बनगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.