कोल्हापूर : महापालिकेच्या रिक्त झालेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडी मंगळवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता होणार आहेत, तर शुक्रवारी (दि. १५) दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत अर्ज दाखल करता येणार आहे. दोन्ही पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.महापालिकेमध्ये सध्या काँगे्रस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. आघाडीनुसार पदांचे वाटप निश्चित आहे. वर्षभरासाठी राष्ट्रवादीकडे महापौर, तर काँगे्रसकडे उपमहापौरपद आहे. राष्ट्रवादीच्या माधवी गवंडी यांनी महापौरपदाचा आणि काँगे्रसचे भूपाल शेटे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे पत्र मनपा प्रशासनाने पाठविले होते.
विभागीय आयुक्तांनी सोमवारी दोन्ही पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात १९ रोजी निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या विशेष सभेमध्ये ही निवड प्रक्रिया होणार आहे.महापौर, उपमहापैर निवडणूक कार्यक्रम
- मतदान - १९ नोव्हेंबर सकाळी ११ वाजता
- अर्ज दाखल - १५ नोव्हेंबर दुपारी ३ ते ५(छत्रपती ताराराणी सभागृह महापालिका)
अर्ज दाखल झाल्यानंतर नगरसेवक सहलीवरराष्ट्रवादीतून अॅड. सूरमंजिरी लाटकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांनी गाठीभेटीही सुरू केल्या आहेत. आघाडीतील सर्व पदाधिकारी, नगरसेवकांच्या त्या भेट घेत आहेत. भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौरपदासाठी स्मिता माने यांच्या नावाची चर्चा आहे.
अद्यापही त्यांच्याकडून कोणत्याच हालचाली सुरू नाहीत. काँगे्रस-राष्ट्रवादी नगरसेवकांची येत्या दोन दिवसांत संयुक्त बैठक होणार आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व नगरसेवकांना सहलीवर पाठविले जाणार आहे. दरम्यान, दोन्ही आघाडीकडून व्हिप बजाविण्यात येणार आहे.महापालिकेतील पक्षीय बलाबल
- काँगे्रस - ३0
- राष्ट्रवादी - १४
- भाजप - १४
- ताराराणी आघाडी - १९
- शिवसेना - ४
एकूण - ८१