कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सरसकट सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी देण्याचा तिढा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या भेटीनंतरही बुधवारी कायम राहिला. त्यामुळे आज, गुरुवारपासून दुकाने उघडण्याचा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचा निर्णय तात्पुरता स्थगित करावा लागला. राज्य सरकारचा निर्णय पाहून दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.
शहरातील सरसकट दुकाने उघडण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली असून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली चेंबर ऑफ कॉमर्सचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात आमदार चंद्रकांत जाधव, चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, धनंजय दुग्गे, प्रशांत शिंदे यांचाही समावेश होता.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नसताना लॉकडाऊन सुरु केल्यामुळे सर्वाधिक काळ ८५ दिवस दुकाने बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. कोल्हापूर शहर व क्षेत्र विकास प्राधिकरणात येणारी ४२ गावे यांचा समावेश करुन पॉझिटिव्हिटिच्या रेटवर आधारित निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांना करण्यात आली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी संबंधित सचिवांना कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थितीचा संपूर्ण अहवाल आज, गुरुवारी सायंकाळपर्यंत मागवून घ्या, अशा सूचना देत व्यापाऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन शिष्टमंळाला दिले.
कोल्हापुरातील व्यापाऱ्यांच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कानावर घातले असता त्यांनी ही गोष्ट मनावर घेतली आहे. त्यांनी आम्हाला गुरुवारी सायंकाळपर्यंत निर्णय घेऊ, असे सांगितले असल्याचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आणखी एक दिवस आम्हाला वाट पहावी लागणार आहे. आम्ही मुंबईतच थांबलो असून गुरुवारी काय निर्णय देतात ते पाहून पुढील भूमिका ठरविली जाईल. आज, गुरुवारपासून सरसकट दुकाने उघडण्याचा घेतलेला निर्णय स्थगित करण्यात येत आहे.