कोल्हापूर : थकबाकीपोटी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे तारण असलेल्या चंदगडच्या दौलत सहकारी साखर कारखान्याचा ताबा बँकेकडे राहणार की पुन्हा न्यूट्रीयन्स कंपनीकडे जाणार याबाबतचा फैसला सोमवारी (दि. ४ फेब्रुवारी) होणार आहे. भाडे करार मोडून कारखान्याचा ताबा घेतलेल्या बँकेच्या विरोधात न्यूट्रीयन्स कंपनीने जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे, त्याची सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली.चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखाना थकबाकीपोटी जिल्हा बँकेकडे तारण आहे. बँकेचा परवाना धोक्यात आल्याने दोन वर्षांपूर्वी ४२ वर्षांच्या भाडे करारावर हा कारखाना बँकेने न्यूट्रीयन्स अॅग्रो फ्रुटस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला चालविण्यास दिला. करारात ठरल्याप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी ३३ कोटी ५७ लाख ८४ हजार रुपये कंपनीने बँकेकडे जमा केले; पण उर्वरित हफ्ते जमा करण्याबाबत चालढकल केली. शेतकरी, कामगारांचीही देणी थकली.
या तक्रारींची दखल घेत बँकेने पैसे भरण्याविषयी वारंवार नोटीस दिली; पण कंपनीकडून असमर्थतता दर्शविली गेल्याने अखेर संचालक मंडळाने न्यूट्रीयन्सबरोबरचा करार मोडत असल्याचे जाहीर केले. तसे कंपनीला कळवून डिसेंबरमध्ये कारखान्याचा रितसर ताबा घेत गेटला कुलूपही लावले. ताब्यात आल्यानंतर पुन्हा भाडे कराराने देण्यासंदर्भात बँकेकडून निविदाही प्रसिद्ध करण्यात आली.
दरम्यान, ही सर्व प्रक्रिया सुरू असताना कारखान्याचा ताबा बँकेने बेकायदेशीरपणे घेतला असल्याचे सांगत जिल्हा न्यायालयात बँकेच्या विरोधात याचिका दाखल केली. या याचिकेवर गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली.