कोल्हापूर : राज्य शासनाने सर्व व्यापारी आस्थापने उघडण्यासंबंधी गुरुवार रात्रीपर्यंत निर्णय घेतला नाही तर आज शुक्रवारी दुपारी चार वाजता व्यापारी संघटना आपली पुढील दिशा ठरवतील, असा निर्णय गुरुवारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत घेण्यात आला.
सरसकट बंदला व्यावसायिकांनी विरोध केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला आहे. दरम्यान गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही राज्याचा निर्णय होईपर्यंत सहकार्य करा, असे सांगत सी.ए. ऑफीस, चारचाकी गाड्याचे स्पेअरपार्ट विक्री करणारी दुकाने व बांधकाम साहित्य विक्री गोडावूनमधून करण्यास परवानगी दिली. त्यानंतर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सशी संलग्न संघटनांची बैठक झाली. यावेळी गुरुवारी रात्रीपर्यंत सर्व व्यापारी आस्थापना उघडणेसंबंधी शासनाचा कोणताही निर्णय किंवा परिपत्रक मिळाले नाही तर आज शुक्रवारी दुपारी चार वाजता बैठक घेऊन पुढील दिशा ठरण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर या राज्यस्तरीय व्यापारी संघटनेची सर्व राज्यातील व्यापारी असोसिएशन याच्यांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे होणाऱ्या मिटिंगमध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आपली बाजू मांडावी, असे ठरले.
यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, मानद सचिव जयेश ओसवाल व वैभव सावर्डेकर,, माजी अध्यक्ष आनंद माने व प्रदीपभाई कापडिया यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व संचालक मंडळ व सर्व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
--
सराफ व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवावीत
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी निवेदन प्रसिद्ध करून त्यात पुण्याहून उद्या दुकाने चालू करण्यासंदर्भात 'व्हॉइस क्लिप' आणि मेसेज व्हायरल होत असून तो पुण्यापुरता मर्यादित आहे. कोल्हापुरातील व्यावसायिकांनी राज्याचा निर्णय होईपर्यंत दुकाने बंद ठेवून शासनास सहकार्य करावे, दुकाने उघडल्यानंतर कारवाई झाल्यास कोल्हापूर सराफ व्यापारी संघ अथवा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स कोणत्याही प्रकारे मदत करू शकणार नाही, असे आवाहन केले आहे.
--
फोटो नं ०८०४२०२१-कोल-चेंबर ऑफ कॉमर्स
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासोबत दुकाने बंदबाबत झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने अध्यक्ष संजय शेटे यांनी व्यावसायिकांची बैठक घेऊन पुढील दिशा ठवण्याचा निर्णय घेतला.
-