गडहिंग्लज : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना व अर्कशाळा सहयोग / भाडे / भागीदारी / बीओटी तत्त्वावर चालवायला देण्याचा निर्णय विशेष साधारण सभेत एकमताने झाला. तथापि, अर्थसाहाय्य वेळेत उपलब्ध झाल्यास कारखाना स्वबळावर चालविण्यास संचालक मंडळ तयार आहे, असेही कारखान्याचे अध्यक्ष ॲड. श्रीपतराव शिंदे यांनी सभेत स्पष्ट केले.
कारखाना आठ वर्षे सहयोग तत्त्वावर चालविल्यानंतर ब्रिस्क कंपनीने या वर्षी मार्चअखेरीस तो सोडला आहे. त्यानंतर सहकार खात्याने कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात दिला आहे. परंतु, नक्त मूल्य उणे असल्यामुळे अद्याप अर्थसाहाय्य उपलब्ध न झाल्याने कारखाना चालवायला देण्यासंदर्भातील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी ही सभा बोलावण्यात आली होती. येथील मंत्री हॉलमध्ये ऑनलाईन पद्धतीने सभा झाली.
शिंदे म्हणाले, ब्रिस्कने कराराची मुदत संपण्यापूर्वी कारखाना सोडल्यामुळे नाइलाजानेच संचालकांनी कारखाना ताब्यात घेतला आहे. स्वबळावरच चालविण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत राहील. गळीत हंगाम वेळेवर सुरू करण्यासाठी कामगार रात्रंदिवस झटत आहेत.
उपाध्यक्ष डॉ. संग्रामसिंह नलवडे म्हणाले, कारखान्याचा संचित तोटा ६४ कोटी ६१ लाख इतका आहे; परंतु, वैधानिक लेखापरीक्षणानंतर नक्त मूल्य अधिक झाल्यामुळे अर्थसाहाय्याला कोणतीही अडचण नाही. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांना विनंती करणार आहोत.
संचालक सतीश पाटील यांनी स्वागत केले. मुख्य लेखाव्यवस्थापक बापू रेडेकर यांनी विषयपत्रिका वाचली. प्रकाश भम्मानगोळ यांनी सूत्रसंचालन केले. संचालक अमर चव्हाण यांनी आभार मानले.
-
चौकटी : १) मुश्रीफ यांचा होकार नाही; पण... !
जिल्हा बँकेकडून कारखान्याला अर्थसाहाय्य करण्याची विनंती मंत्री मुश्रीफ यांना आपण नूलच्या कार्यक्रमात केली आहे; परंतु, त्याला त्यांनी होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाही, असे शिंदे यांनी सांगितले.
२) न्यायालयाच्या निकालाचे पालन करू
सेवानिवृत्त कामगारांनी आपल्या थकीत देण्यांसंदर्भात लेखी प्रश्न विचारला होता; परंतु, तो विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाच्या निकालाचे पालन केले जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
फोटो ओळी-
गडहिंग्लज येथे अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या विशेष साधारण सभेत अध्यक्ष ॲड. श्रीपतराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष डॉ. संग्रामसिंह नलवडे, डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.