कोल्हापूर : सोळा वर्षांवरील रिक्षा स्क्रॅपचा निर्णय रद्द करावा, यासह गॅस टाकी हायड्रो टेस्टची कोल्हापुरात सोय करावी, यांसह अन्य मागण्यांकरिता ताराराणी रिक्षा व्यावसायिक संघटनेतर्फे गुरुवारी दिवसभर प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले.सोळा वर्षांवरील रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील ३९१६ रिक्षाचालकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढणार आहे; म्हणून हा निर्णय रद्द करा. याशिवाय जिल्ह्यात २०१० पासून रिक्षाला एल. पी.जी. किट बसविण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, अजूनही त्या किटची हायड्रो टेस्ट करण्याचे प्रमाणपत्र मिळण्याची बंगलोरशिवाय कोठेही सोय नाही. त्यामुळे जोपर्यंत जिल्ह्यात हायड्रो टेस्ट करण्याची सोय होत नाही, तोपर्यंत रिक्षा पासिंग करून द्याव्यात.
एस. टी.ची शहरांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू आहे. याशिवाय के.एम.टी.च्या बसेस विनापासिंग शहरात फिरत आहेत. अशा बसेसवर कारवाई करावी, या सर्व बाबींचा विचार करून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कायदेशीर रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांना न्याय द्यावा; अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यावेळी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष शंकरलाल पंडित, उस्मान सुतार, रमेश चिखलीकर, उमर शेख, अनिल पाटील, संदीप मोहिते, आदी मान्यवर उपस्थित होते.