कोल्हापूर : ऊस तोडणी वाहतूक दरात ३४ टक्के व कमिशन दरात १ टक्का वाढ करण्याचा उभयमान्य तोडगा पुणे येथील साखर संघ पदाधिकारी आणि ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुरुवारी काढण्यात आला. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.पुणे येथील साखर संकुलात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या विषयावरील ही सहावी बैठक होती. त्यामध्ये साधकबाधक चर्चा झाल्यानंतर हा तोडगा काढण्यात आला. या बैठकीत ॲडव्हान्सबाबतची फसवणूक बंद करण्यासाठी एक कायदा करून ऊस वाहतूकदार तसेच मुकादमांना संरक्षण देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. कल्याणकारी महामंडळात नोंदणी करून ओळखपत्र देणे आणि कामगारांना सुविधा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी बैठका घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.या दरवाढीमुळे राज्यातील ऊसतोड कामगारांना हंगामासाठी सुमारे ११५० कोटी रुपयांची म्हणजेच प्रत्येक मजुराला ११ हजार ५०० रुपयांची वाढ मिळणार असून तीन हंगामांसाठी हा लाभ मिळणार आहे.या बैठकीला साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, नॅशनल फेडरेशनचे जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, पंकजा मुंडे उपस्थित होत्या. तर, ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनेचे डॉ. डी.एल. कराड, आमदार सुरेश धस, प्रा. डाॅ. सुभाष जाधव, मोहन जाधव, सुशीलाताई मोराळे, दादासाहेब मुंडे, जीवन राठोड, प्रा. आबासाहेब चौगले, सुखदेव सानप, श्रीमंत जायभाये, दत्तात्रय भांगे, थोरे पाटील यांनी चर्चेत भाग घेतला.
शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कामगारांना समाधानकारक वाढ झाली आहे. आंदोलन मागे घेण्यात आले असून उर्वरित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा करत राहू. - प्रा. डाॅ. सुभाष जाधव, सरचिटणीस, महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना.