कोल्हापूर : वैद्यकीय मागणीपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याने उद्योगांसाठी काही प्रमाणात ऑक्सिजन देण्याबाबत जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शासनाचे आदेश आणि जिल्ह्यातील उपलब्ध ऑक्सिजन साठा याचा विचार करून आज शुक्रवारी यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी दिली.
राज्य शासनाकडून ८० टक्के ऑक्सिजनचा वापर वैद्यकीय कारणांसाठी तर, २० टक्के ऑक्सिजन उद्योगांसाठी देण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांनी एफडीआयला दिले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडे गुरुवारी रात्रीपर्यंत हे पत्र न आल्याने गुरुवारी याबाबत निर्णय होऊ शकला नाही. आज शुक्रवारी मात्र यावर निर्णय होईल, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी पवार यांनी दिली.
जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचा उच्चांक सुरू असून रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहेत. महिन्यापूर्वी जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा होता, आता मात्र पुण्यातील रुग्ण कमी झाल्याने तेथून वितरकांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढला आहे. याशिवाय जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात ऑक्सिजन पाठवले जात होते, तेदेखील बंद आहे. तसेच वैद्यकीय कारणांसाठीची मागणी २ ते ३ टनांनी कमी झाल्याने वितरकांकडे सध्या एक दिवसाचा ऑक्सिजन साठा शिल्लक राहत आहे. त्यामुळे उद्योजकांनी जिल्हा प्रशासनाकडे औद्योगिक कारणांसाठी ऑक्सिजनचा वापर करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. चार दिवसांपूर्वी उद्योजकांशी झालेल्या चर्चेत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आम्ही ऑक्सिजनची उपलब्धता, पुरवठा याचा विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन उद्योजकांना दिले होते.