इचलकरंजी : शहर परिसरातील औद्योगिकीकरण वाढत असल्याने इचलकरंजीत स्वतंत्र तहसील कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे स्वतंत्र तालुका जाहीर करावा, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी पावसाळी अधिवेशनात केली. तसेच कबनूरला नगर परिषद करा, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात एमआरआय मशीन आणि आवश्यक कर्मचारी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही केली.मतदारसंघातील प्रलंबित विषयांवर अधिवेशनात चर्चा करताना आवाडे यांनी प्रमुख मागण्या केल्या. त्यामध्ये, सन १९८५ पासून सातत्याने इचलकरंजी स्वतंत्र तालुका जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. त्याचा प्राधान्याने विचार करून तालुका जाहीर करावा. शहरालगत ७० हजार लोकसंख्या असलेल्या कबनूरला नगर परिषद करण्याची मागणी आहे. कायद्यानुसार ५० हजार लोकसंख्येला नगर परिषद करावी, अशा सूचना असताना हा प्रश्न प्रलंबित आहे. त्याची मंजुरी देऊन अंमलबजावणी करावी.चंदूर-आभार फाटा या ठिकाणी महिला बचत गट भवनच्या विनावापर असलेल्या इमारतीत साजणीचे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतर करावे. इंदिरा गांधी रुग्णालय सन २०१६ साली शासनाने ताब्यात घेतले आहे. हे रुग्णालय आजतागायत आवश्यक कर्मचारी नसल्याने पूर्ण क्षमतेने चालत नाही. त्यामुळे मंजूर १४७ कर्मचाऱ्यांसह एमआरआय मशीन बसवावे, आदी मागण्या केल्या.
Kolhapur: इचलकरंजीला स्वतंत्र तालुका घोषित करा, आमदार प्रकाश आवाडे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 1:59 PM