कोल्हापूर : शहरासह अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील विविध धरणांमधीलपाणीसाठा कमी असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी काटकसरीने वापरण्याची गरज असून, शेतीसाठी पाणी सोडल्यानंतरही त्यातील काही दिवस उपसाबंदी करावी लागणार असल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.एप्रिलपासून मे अखेरपर्यंत कोल्हापूर आणि परिसरातील नदीकाठच्या गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी साडेतीन ते चार टीएमसी पाण्याची गरज असते. अशात सध्या राधानगरी धरणामध्ये ३.३७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. गैबीमधून एक टीएमसी पाणी उपलब्ध होणारे आहे. तसेच तुळशी, कुंभी आणि कासारी धरणांतून किमान अर्धा टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आवश्यक तेवढा पाणीसाठा जरी सध्या धरणांमध्ये असला तरी पावसाळा लांबला तर मात्र, पाण्याची फार टंचाई भासू शकते. त्यामुळेच सर्व पातळ्यांवर पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा ठरत आहे.एल निनोमुळे पावसाचे प्रमाण थाेडे कमी राहील, असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याची दखल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेऊन गेल्या पंधरवड्यापासून महापालिकांच्या पाणी वितरणातही कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच जर पावसाळा वेळेत सुरू झाला नाही तर मात्र सध्या धरणांमध्ये असलेले पाणी पुरेलच याची खात्री देता येणार नाही. त्याचमुळे येणाऱ्या दीड महिन्यात शेतीसाठीही पाणी सोडताना उपसाबंदीचा पाटबंधारे विभागाला विचार करावा लागणार आहे.गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. यापुढच्या काळातही अशाच पद्धतीने अवकाळी नसले तरी वळवाचे मोठे पाऊस जर धरणक्षेत्रात झाले तर ते सिंचनासाठी आणि उपलब्ध पाणीसाठा पुरण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळेच वळीव किती, कसा आणि कुठे पडणार आहे, एल निनोचा प्रभाव राहणार आहे का आणि पावसाळा वेळेत सुरू होणार का, असे काही प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. परंतु तरीही मोठ्या पाणीटंचाईसारखी स्थिती सध्या तरी नसल्याचे चित्र आहे.
दोन महिन्यांची गरज भागणारपुढील दोन महिन्यांची कोल्हापूर शहराची गरज भागेल एवढा पाणीसाठा राधानगरी व काळम्मावाडी धरणांत आहे. परंतु पावसाळा लांबला तर मात्र पाणीटंचाईचे संकट कोल्हापूर शहरावर येऊ शकते, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे.
सध्या तरी शेतीसाठी आणि पिण्यासाठी आवश्यक पाणीसाठा धरणांमध्ये आहे. तरीही दक्षता म्हणून यानंतरही सिंचनासाठी पाणी सोडताना प्रत्येक आवर्तनामध्ये काही दिवस उपसाबंदी जाहीर करावी लागणार आहे. त्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. -रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर
धरण - गतवर्षीचा पाणीसाठा - यंदाचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)राधानगरी - ४.०६ - ३.३७तुळशी - २.११ - १.६४वारणा - १२.१६ - १४.९४दूधगंगा - १२.१२ - ६.२६कासारी - १.३३ - १.१३कडवी - १.१५ - १.३५कुंभी - १.८० - १.५५पाटगाव - १.९८ - १.५३