आयूब मुल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क, खोची : हातकणंगले तालुक्यातील वारणा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने अनेक ठिकाणी पिण्याच्या तसेच शेतीच्या पाणीपुरवठ्याचा खोळंबा झाला आहे. विशेष म्हणजे उघड्या पडलेल्या मोटारी पुन्हा पाण्यात सोडण्यासाठी पाईप जोडण्याच्या कामाची चांगलीच धांदल उडाली आहे.
वारणा नदीवर मांगले येथे असणाऱ्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग गेल्या चार दिवसांपासून कमी करण्यात आलेला आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी होत गेली. विशेष म्हणजे नदीचे पात्र अनेक ठिकाणी रिकामे झाल्याचे दिसत आहे. पृष्ठभाग दिसू लागला असून वाळूचे ढीग पाहायला मिळत आहेत.
जिथे डोह आहे तिथे पाण्याचा थोडा साठा आहे. या डोहात असणाऱ्या मोटारी मात्र पाणीपुरवठा करत आहेत. बहुतांश विद्युत मोटारी पाणी कमी झाल्याने उघड्यावर दिसत आहेत. त्यामुळे या मोटारीद्वारे होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामध्ये गाव पाणीपुरवठा तसेच सहकारी खासगी तत्त्वावरील पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे.
यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पाण्याअभावी वारणाकाठच्या शेतकऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे.
उन्हाचा तडाखा प्रचंड असल्याने पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे काहीही करून पाणी सुरू करण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागला आहे. याचाच एक भाग म्हणजे ज्या मोटारी पाणी कमी झाल्याने उघड्यावर आहेत त्या सुमारे १५ फूट पाईप जादा जोडून पाणी आहेत तिथेपर्यंत सोडल्या जात आहेत. यासाठी मात्र कसरत होताना दिसत आहे. विशेष म्हणजे पाणी वाढल्यावर परत त्या मोटारी आणखीवर घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे नंतरच्यापेक्षा सध्याची गरज ओळखून उपाय करण्याला महत्त्व दिले आहे.
वाठार तर्फ वडगाव, वाठार तर्फ उदगाव या गावात पिण्याच्या पाणीपुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांची चांगलीच धांदल उडाली आहे. खासगी कूपनलिकांवर पाण्यासाठी गर्दी होत आहे. ज्यांना पाणी कमी होईल याचा अंदाज आला नाही त्यांनी नेहमीप्रमाणे चालू ठेवल्याने मोटारीत बिघाड झाला आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसला आहे.
उद्या परवा पाणी पातळी सुरळीत होईल, असे पाटबंधारे विभागाचे मत आहे.
२१ वारणा नदी