लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे बंधनकारक केल्याचा विधायक परिणाम दिसू लागला आहे. सातत्याने मास्क वापर सुरूच असल्याने ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यत: धुळीच्या भपकाऱ्यापासून बचाव करण्यात मास्कचा चांगला उपयोग होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्राचे मत आहे.
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापासून सर्वच नागरिकांना मास्क सक्ती करण्यात आली. सुरुवातीला नागरिकांना ही सक्ती कशासाठी, असा प्रश्न पडला होता. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे या सूचनेचे पालन करण्यात आले. पोलिसांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनीही मास्क न लावल्यास दंडाची तरतूद केल्याने नागरिकांनी मास्क नियमितपणे वापरण्यास सुरुवात केली. कोल्हापूर महापालिकेतर्फे आजही विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड आकारणी करण्यात येत आहे.
सलग सात महिने मास्क वापरल्यानंतर आता त्याचे फायदेही दिसू लागले आहेत. एकतर कोरोनाचा संसर्ग रोखण्यात या मास्कचा उपयोग झालाच, परंतु आता थंडीचा मोसम सुरू झाला असला, तरी तुलनेत सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांत घट झाली आहे. याबाबत काही डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर नाक आणि तोंड उघडे असणे आणि एखाद्या आजाराचा प्रादुर्भाव होणे याचा जवळचा संबंध आहे. मास्कच्या माध्यमातून हाच प्रादुर्भाव रोखला जात असल्यामुळे ही संख्या सध्या कमी दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
तापसदृश आजार, सर्दी, खोकला याची नाक आणि तोंडावाटेच लागण हाेत असते. मात्र सध्या मास्क वापरण्यामुळे अशा पध्दतीचे किटाणू, विषाणू शरीरात प्रवेश करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मास्कच्या सातत्यपूर्ण वापरामुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येत आहे.
डॉ. उमेश कदम
अधीक्षक, सेवा रुग्णालय बावडा, कोल्हापूर
कोट
मला नेहमी सर्दीचा त्रास होत असे. परंतु गेल्या काही महिन्यांत एक तर बाहेर जाण्यावर मर्यादा आल्या. बाहेर जाण्याचा प्रसंग आला, तर तोंडाला मास्क लावत असल्याने सर्दीचा त्रास कमी झाला. त्यामुळे शासनाने सांगण्यापेक्षा आपणहून आवश्यक त्यावेळी मास्कचा जास्तीत-जास्त वापर करणे हिताचे ठरणार आहे.
रशीद पठाण, कोल्हापूर