कोल्हापूर : महाराष्ट्रामधील भाजपचा विजय हा देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा ठरणार आहे. त्यामुळे तुमचा एक पूर्ण महिना पक्षासाठी द्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील विरोधकांचा पाया उखडून टाकत शरदराव आणि कंपनीला पराभूत करा, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी केले. आपला प्रचार करतानाच घड्याळ आणि धनुष्यबाणालाही सोबत घेऊन जायचे आहे हे देखील लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये बुधवारी रात्री झालेल्या पाच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिशय आक्रमक आणि खणखणीत पद्धतीने मांडणी करत शाह यांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याचा प्रयत्न यावेळी केला. कार्यकर्त्यांनीही शाह यांच्या या आवाहनाला हात उंचावत जोरदार प्रतिसाद दिला. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस शिवकुमार, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री दिलीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाह म्हणाले, लोकसभेला अपेक्षित जागा आल्या नाहीत म्हणून कार्यकर्ते नाराज झाले आहेत. परंतु मुळात आपण तिसऱ्यांदा सत्तेत आलो आहोत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत हे मनावर बिंबवा. या नैराश्यातून बाहेर पडा. केवळ सत्ता हेच आपले साध्य नाही. महाराष्ट्रातील ही निवडणूक ‘जोश’मध्ये लढवायची नसून ‘होश’मध्ये लढवायची असून त्यासाठी मी जे काही सांगेन ते तुम्हाला करावे लागणार आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फेक नरेटिव्हच्या माध्यमातून लोकसभेला आपण थोडे पिछाडीवर आलो. परंतु आता केलेल्या कामाचा दिंडोरा पिटा. जी कामं केलीत ती ताकदीनं सांगा. ज्या महाविकास आघाडीने काेणाला फुटकी कवडी दिली नाही त्यांना आता ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर द्या. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं आहे. सांगली, साताऱ्यातील दुष्काळ संपवला आहे. कोल्हापूर, सांगलीतील पुराचे पाणी वळवले जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील सर्व रेकॉर्ड तोडा.