आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २९: देवकर पाणंद, पांडूरंग नगरी मांगल्य अंगण कॉलनीमध्ये चोरट्यांनी कुत्र्याला गुंगीचे औषध देवून रोबंगला फोडून रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे पन्नास हजार किंमतीचा ऐवज लंपास केल्याचे सोमवारी उघडकीस आले. आजूबाजूला घरे, बंगलो, अपार्टमेंन्ट असूनही बंगला फोडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
अधिक माहिती अशी, देवकर पाणंद येथे पांडूरंग नगरी मांगल्य अंगण कॉलनीमध्ये जयश्री विद्याधर पटवर्धन यांचा रोबंगला आहे. त्यांचे पती विज मंडळात अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. या दोघांसह त्यांचा मुलगा असे तिघे याठिकाणी राहतात. चार दिवसापूर्वी सर्वजण अलिबागला नातेवाईकांच्या घरी गेले होते. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास ते घरी परत आले असता रोबंगल्याच्या मुख दरवाजासमोरील लोखंडी गजास बांधलेले कुत्रे निपचित पडले होते. त्याचा फक्त श्वास सुरु होता. नेहमी कोणीही आले तर भुंकणारे कुत्रे निपचित पडल्याले पाहून पटवर्धन कुटुंबियांना काही समजेना.
दरवाजा उघडण्यासाठी जवळ गेले असता कडी-कोयंडा तुटलेला दिसला. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आतमध्ये जावून पाहिले असता हॉलमधील कपाटातील साहित्य विस्कटलेले दिसले. दूसऱ्या मजल्यावरील बेडरुममधील तिजोरीतील साहित्य बेडवर टाकले होते. त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम पाच हजार रुपये चोरीला गेलेचे दिसले. या प्रकाराची वर्दी विद्याधर पटवर्धन यांनी जुनाराजवाडा पोलीसांना दिली.
पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ, उपनिरीक्षक आर. पी. भूतकर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. गेल्या दोन महिन्यात घरफोड्या कडी-कोयंडा तोडून झाल्या. याठिकाणी मात्र कुत्र्याला गुंगीचे औषध देवून घरफोडी झाली. हा प्रकार गंभीर असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकास बोलविण्यात आले. श्वान परिसरातचं घुटमळले. बंगल्यापासून काही अंतरावर रस्त्याकडेला एक बाटली सापडली. ती पोलीसांनी ताब्यात घेवून पटवर्धन कुटूंबियांना दाखविली असता ती घरातील असल्याचे त्यांनी सांगितले. या कॉलनीच्या सुरुवातीस हॉटेल, बिअर बार आहे. तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलीसांनी तपासले. (प्रतिनिधी)
कुत्र्यावर उपचार
चोरट्यांनी नेमके कोणते गुंगीचे औषध कुत्र्याला दिले आहे. यासाठी पोलीसांनी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांना बोलवून घेतले. डॉक्टरांनी कुत्र्याची तपासणी करुन त्याच्या रक्ताचे नमुने घेतले. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यामागचे चित्र स्पष्ट होईल.