राजाराम कांबळे ।मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि त्याच्या अंतर्गत उपकेंद्रे, शासनाच्या मलकापूर येथे असणाºया शासकीय ग्रामीण रुग्णालयावर रुग्णांना अवलंबून राहावे लागत आहे. तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्षे रिक्त पदांमुळे रुग्णांना सेवा मिळत नाही. तर सेवेत असणाºया वैद्यकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे रुग्ण व आरोग्य विभागाला त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधीदेखील गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत. आरोग्य विभागात कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदांमुळे सर्वसामान्य रुग्णांची खासगी डॉक्टर लूट करीत आहेत.जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग दुर्गम, डोंगराळ तालुक्यातील जनतेला आरोग्याची सेवा व्यवस्थित देत नसल्यामुळे वाड्या-वस्त्यांवर बोगस डॉक्टरांची चलती आहे, अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे धाडस तालुका वैद्यकीय समिती करीत नाही. उपचारांअभावी गरीब रुग्णांना कोल्हापुरातील सीपीआरचा आधार घ्यावा लागत आहे.
शाहूवाडी तालुक्यात १३१ गावे २५० वाड्या-वस्त्यांमधून डोंगर कपारीत तालुका वसला आहे. सुमारे पावणेदोन लाख लोकसंख्या असून, दुर्गम भागात नागरिक वस्ती करून आहेत. या लोकसंख्येचे आरोग्य जपण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, रिक्त पदांमुळे रुग्णांना आरोग्याची सेवा मिळत नाही. आंबा, निनाई परळे, शित्तूर वारूण, भेडसगाव, बांबवडे, करंजफेण, सरूड, माण, मांजरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तर मलकापूर येथे ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. ग्रामीण रुग्णालय मुख्य असून, प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रातून वर्षाला ७५ हजार बाह्यरुग्ण, तर १५ हजार आंतररुणांना उत्तम प्रकारे सेवा दिली जात आहे.
दरवर्षी पल्स पोलिओ, गोवर, क्षयरोग, कावीळ, मलेरिया, डायरिया, पेंटा, प्रतिबंधक लस, आदी प्रकारच्या लसी दिल्या जातात. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण ९३ टक्के आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत जिल्ह्यात भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्काराने सन्मानित केले आहे. तालुक्यात नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, 3८ उपकेंद्रे आहेत. या केंद्रात रुग्णांना ने-आण करण्यासाठी नऊ रुग्णवाहिका, तर १०८ तीन रुग्णवाहिका कार्यरत आहेत. तालुक्यात क्षयरोग तपासणी मोहीम सुरू आहे. बारा गावांमध्ये क्षयरोग मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे.
तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सात वैद्यकीय अधिकारी पदे रिक्तआहेत. बांबवडे, करंजफेण, माण, मांजरे, परळे निनाई, सरूड, शित्तूर वारूण, आदी प्राथमिक केंद्रांमध्ये डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. उपस्थित असणाºया डॉक्टरांवर इतर ठिकाणी देखील सेवा द्यावी लागत असल्यामुळे त्यांना तारेवरची कसरत होते. आरोग्यसेविकांची १४ पदे रिक्त आहेत. तर आठ आरोग्यसेवकांची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना सेवा मिळत नाही.मलकापुरात एकमेव ग्रामीण रूग्णालयशाहूवाडी तालुक्यात एकमेव मलकापूर येथे शासनाचे ग्रामीण रुग्णालय आहे. तालुक्यातून कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. आंबा घाट, अणुस्कुरा घाट, अमेणी घाट असल्यामुळे वाहनांची नेहमी गर्दी असते. त्यामुळे अपघाताची संख्या जास्त असल्याने रुग्णांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचा मोठा आधार आहे.तीन आयुर्वेदिक दवाखाने बंदतालुक्यातील नांदगाव, विरळे, मोसम येथील वैद्यकीय अधिकारी नसल्याने हे तीन आयुर्वेदिकदवाखाने बंद आहेत. सदर तीन गावे दुर्गम भागात असून, येथील नागरिकांना रुग्णसेवा मिळत नाही. त्यामुळे तालुक्याच्या अशा अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक दवाखाने बंद आहेत. प्रशासन दवाखाने चालू करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत.
तालुक्यातील बांबवडे येथे ग्रामीण रुग्णालय होण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रिक्त जागांची कमतरता असली तरी आहे त्या कर्मचारी, डॉक्टर यांच्याकडून नागरिकांना आरोग्याच्या सेवा देण्यास जिल्ह्याचा आरोग्य विभाग बांधील आहे. रिक्त जागा भरण्याकडे शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.- सर्जेराव पाटील-पेरीडकर, सभापती, बांधकाम व आरोग्य समिती.