कोल्हापूर : करिअरच्या सुरुवातीला येणाऱ्या अपयशामुळे आयुष्यभर पश्चात्ताप करण्यापेक्षा अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास निश्चित यश मिळेल, असा सल्ला प्रा. शशिकांत कापसे यांनी शनिवारी येथे दिला. ‘लोकमत युवा नेक्स्ट’ व ओम सायन्स अकॅडमीतर्फे रविवार पेठ, जैन गल्ली येथील ओम सायन्स अकॅडमी येथे अकरावी सायन्सचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ‘अभ्यास तंत्र’ या विषयावर दोनदिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. दहावी म्हणजे करिअरचा टर्निंग पॉर्इंट. या परीक्षेत मिळणाऱ्या टक्केवारीवरून विद्यार्थ्यांची पुढील वाटचाल ठरते. दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी अकरावीला सायन्समधून प्रवेश घेतात आणि पुढे टक्केवारी घसरू लागते. विद्यार्थ्यांच्या करिअरचा आलेख कायम चढता राहावा यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली आहे. ‘लोकमत’तर्फे प्रा. शशिकांत कापसे यांना पुष्पगुच्छ देऊन या कार्यशाळेला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता, दुपारी ४ वाजता व सायंकाळी ६ वाजता अशी तीन सत्रे घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थी व पालकांची उत्स्फूर्त गर्दी झाली होती. ‘दहावीनंतर पुढे काय’ असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडतो याचे नेमके उत्तर यावेळी प्रा. कापसे यांनी मार्गदर्शनातून दिले. त्यात परीक्षेतील बदलांची माहिती, पेपर वेळेत कसा सोडवावा, उत्तरपत्रिका कशी लिहावी, कोणते घटक पाठांतर करावेत, लेखनकौशल्य आणि वेळेच्या नियोजनासह तणावमुक्त परीक्षा कशी द्यावी, त्याचबरोबर विज्ञान शाखेत असलेल्या संधीपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चित दिशा कोणती, याबाबतचा कानमंत्रही त्यांनी दिला. प्रा. कापसे म्हणाले, नव्या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये आकलनशक्ती प्रचंड आहे. मात्र, त्यांना योग्य वस्तुनिष्ठ मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांचा बहुमोल वेळ वाया जातो. दहावीत मर्यादित अभ्यासक्रमामुळे मुले ९० टक्के मार्क मिळवितात, परंतु अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढल्यानंतर याच विद्यार्थ्यांची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत घसरते. याला नियोजनबद्ध अभ्यासाचा अभाव कारणीभूत ठरतो. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते, मात्र त्यापैकी मोजक्याच विद्यार्थ्यांचे ध्येय निश्चित असते. अशा विद्यार्थ्यांमध्ये आपला समावेश होण्यासाठी ९५ टक्केगुण मिळविण्याचे ध्येय निश्चित करण्याची गरज आहे. ध्येय निश्चित केले नाही तर स्वप्न साकार होत नाहीत. त्यामुळे केवळ पासिंग गुणांवर समाधान मानावे लागते. परिणामी, भविष्यात अनेक अडचणी निर्माण होऊन त्या सोडविण्यासाठी संपूर्ण आयुष्य संपून जाते. अशा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, एकाग्रता, लेखन कौशल्य, वेळेचे नियोजन, मास्टर थॉटस, माइंड पॉवर असल्याशिवाय ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचता येणार नाही.
नियोजनबद्ध अभ्यासाने निश्चित यश
By admin | Published: February 26, 2017 12:53 AM