कोल्हापूर : शहरांतर्गत वादग्रस्त टोलसंदर्भात मूल्यांकन आल्यावर त्वरित निर्णय घेऊन टोल घालवूच, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले. टोलची खरी जबाबदारी कोल्हापूर महापालिकेची असली तरी राज्य सरकार महापालिकेला मदत करील, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री म्हणाले, टोलची जबाबदारी महापालिकेची असून ती निभावण्यासाठी शासन या नात्याने योग्य ती मदत आम्ही करू. कराराप्रमाणे कंपनीला भूखंड देण्याबरोबरच उर्वरीत रक्कम कर्जस्वरूपात देण्याची व्यवस्था केली जाईल. टोल बंद करावयाचा झाल्यास संबंधित कंपन्यांना १८ हजार ५०० कोटी द्यावे लागतील. यांपैकी सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत ८५०० कोटी, तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ अंतर्गत दहा हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांचा समावेश आहे. टोल बंद करण्यासाठी एखादा ‘हेवी इन्कम’ (जास्त वसुली) देणारा टोलनाका १० वर्षे सुरू ठेवून त्या उत्पन्नातून राज्यातील इतर टोलचे पैसे भागविता येतील का? हा विचारही सुरू आहे. सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, हे पाहून ‘बीओटी’च्या माध्यमातून अवजड वाहनांची वर्दळ असेल तर कोल्हापूूर-सांगली चौपदरीकरण रस्त्यासाठी टोल लावण्यास हरकत नाही. ते पुढे म्हणाले, संपूर्ण राज्य पारदर्शकपणे चालेल यासाठी प्रयत्नरत आहे. हे सरकार कुठल्याही कामाचे पैसे घेत नाही. त्यामुळे बाहेर कोणी काम करून देतो असे म्हणून पैसे मागत असेल तर अशा दलालांपासून सावध रहा. बदली करून देतो, कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो असे सांगणारे दलाल कार्यरत आहेत; परंतु योग्य कामासाठी एक रुपयाही लागणार नाही. यासाठीच सरकार सत्तेवर आले आहे. मार्च-एप्रिल महिना म्हणजे बदल्यांचा हंगाम आहे. त्यामुळे असे प्रकार वाढतील. त्यामुळे काळजी म्हणून सरकारच्या वतीने हे सांगितले जात आहे. जे कामासाठी पैसे मागतील, त्यांची गय केली जाणार नाही. (प्रतिनिधी)महापालिका बरखास्तीची मुख्यमंत्र्यांकडे मागणीमहापौरांच्या लाचप्रकरणाने महापालिका बदनाम झाली आहे. त्यामुळे ही महापालिकाच बरखास्त करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे; परंतु महापालिका बरखास्तीसाठी कायदेशीर अभ्यास केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.विभागीय क्रीडासंकुलाचे ५ मार्चला उद्घाटनविभागीय क्रीडासंकुलाचे ७५ टक्के काम पूर्ण करून त्याचे उद्घाटन ५ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. ३१ मार्चपर्यंत गळती लागलेला जलतरण तलाव सोडून इतर काम पूर्ण केले जाईल. तलावाचे काम मेपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोल्हापूरचा टोल नक्कीच घालवू
By admin | Published: February 09, 2015 12:33 AM