लोकमत न्यूज नेटवर्क, इचलकरंजी : वस्त्रनगरीत होणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये मोठ्या संख्येने अल्पवयीन मुलांचा समावेश हा घातक आहे. बालगुन्हेगारीचा शिक्का अनेक मुलांना हळूच गुन्हेगारी जगताची कवाडे उघडी करतो. अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारी जगताकडे पडणारे हे पाऊल नक्कीच चिंताजनक व विचार करण्यास भाग पडणारे आहे.
इचलकरंजीच्या कक्षा रूंदावत असून, शहरीकरणामुळे रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. त्याचा परिणाम लोकसंख्येबरोबर गुन्हेगारी घटनांवर देखील पडत आहे. त्यात बालगुन्हेगारी ही समस्या हळूहळू आता उग्ररूप धारण करू पाहते आहे. बालवयातील कोवळी स्वप्न पाहण्याच्या वयात ही मुले दरोडा, बलात्कार, खून, चेन स्नॅचिंग, चोरी, मोटारसायकल चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होत आहेत. या घटनांमध्ये वाढ होण्यामागे टीव्ही, इंटरनेट आणि व्हिडिओ गेम्सच्या तंद्रीत असलेला विद्यार्थी आणि त्याबद्दल बेफिकीर असलेले पालक जबाबदार असू शकतात.
अल्पवयीन गुन्हेगारांची वाढती संख्या भविष्यात सुप्त ज्वालामुखीप्रमाणे ठरू शकते. अल्पवयीन मुले अगदी तरबेज वा मुरलेल्या गुन्हेगारांप्रमाणे समाजविघातक गुन्हे करू लागली आहेत. नुकतेच नगरपालिकेच्या शाळा क्र.२१ मध्ये अल्पवयीन मुलास गांजा ओढताना काही नागरिकांनी रंगेहात पकडले, ही बाब गंभीरच आहे. बदलती लाईफ स्टाईल, महागड्या वस्तूंचे आकर्षण, वाहनांची हौस अशा अनेक कारणांमुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत.
चौकटी
नशिले पदार्थ सहज उपलब्ध
शहरामध्ये युवकांसह अल्पवयीन मुलांनाही चरस, अफू, गांजा यासारखे नशिले पदार्थ सहज व हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नशेची झिंग आल्यास हे युवक नशिले पदार्थ सेवन करतात. नशा करून युवापिढी एखाद्याचा मुडदा पाडण्यास ही मागे-पुढे पाहत नाही. याला अटकाव आणण्यासाठी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे.
पालकांनीही सजग असण्याची गरज
आपली मुले ही दिवसभर काय करत असतात, कुठे फिरत असतात, कोणाला भेटत असतात. या गोष्टीकडे पालकांनीही लक्ष देण्याची गरज आहे. सध्याची परिस्थिती पाहता पालकांना मुलांसाठी वेळ देणे अशक्य होऊन बसले आहे. मुलांमध्ये वाढत असलेली हिंसा, उद्धटपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यात सर्वांत महत्त्वाचे काम पालकांचे असते. आपल्या पातळीवर प्रयत्न करूनही मुला-मुलींच्या वागण्यात बदल होत नसल्यास समुपदेशन हा एक त्यावर उपाय असू शकतो.