कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय, तर तृतीय वर्षाच्या परीक्षा शिवाजी विद्यापीठ पातळीवर घेण्यात याव्यात, अशी शिफारस प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे समितीने विद्या परिषदेला केली.
विविध अधिविभाग आणि विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग सोमवारपासून भरले. त्या पार्श्वभूमीवर या समितीची बैठक झाली. कोरोनाचा संसर्ग वाढल्यास प्रथम सत्राच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने अथवा संसर्ग न वाढल्यास ऑफलाईन स्वरूपात परीक्षा घेण्याबाबतची शिफारस या समितीने विद्या परिषदेला केली आहे.
त्याबाबतचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सोमवारी (दि. २२) होणार आहे. समितीच्या बैठकीस प्राचार्य डॉ. कणसे, आर. व्ही. गुरव, आर. के. कामत, पी. व्ही. कडोले, पी. आर. शेवाळे, आदी उपस्थित होते.