लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सकाळी आणि रात्री आरामबस, हातगाड्या, रिक्षा यांचे अतिक्रमण वाढले असून, अर्ध्याहून अधिक रस्ते अतिक्रमणाने व्यापले आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या अपघाताची वाट पाहणार आहात का? अशी विचारणा शुक्रवारी महानगरपालिका स्थायी समिती सभेत करण्यात आली. अत्यंत रहदारीच्या रस्त्यांवरील या अतिक्रमणाबाबत सदस्यांनी अधिकाºयांना कडक शब्दांत बोल सुनावले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती डॉ. संदीप नेजदार होते.
स्थायी समिती सभेत बसस्थानक परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा आशिष ढवळे यांनी उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. मध्यवर्र्ती बसस्थानकाच्या परिसरात सकाळी खासगी आरामबस, हातगाड्या, रिक्षा, फूटपाथच्या पुढे उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त रस्ता अडविला जातो. हातगाड्यांचे अतिक्रमण हटविले जात नाही. उड्डाणपुलाखाली, पर्ल हॉटेलसमोर, धैर्यप्रसाद कार्यालय, रुईकर कॉलनी, इत्यादी परिसरांत एकाच्या शंभर हातगाड्या होण्याची वाट बघता; मग अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागता. पोलीस बंदोबस्त मिळत नाही म्हणून कारवाई केली जात नाही. त्यामुळे पुन्हा हातगाड्यांचे प्रमाण वाढत राहते. या प्रश्नाकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार आहे की नाही? अशी विचारणा ढवळे यांनी केली.
मध्यवर्र्ती बसस्थानक परिसरातील हॉटेलचालकांनी त्यांचे सांडपाणी ड्रेनेज लाईनला जोडले असून त्यामुळे वारंवार ड्रेनेज तुंबून रस्त्यांवरून मैला वाहत असतो. आरोग्य विभागामार्फत याची पाहणी करण्यात आली होती. त्यावर निर्णय घेऊन अशा हॉटेल व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करून अशी हॉटेल सील करा, अशी मागणीही ढवळे यांनी केली. त्यावेळी स्वत: हॉटेलमालकांनी जर सांडपाणी प्रक्रिया केली नाही तर त्यांचा परवाना रद्द करून हॉटेल सील केले जाईल, अशी ग्वाही संबंधित अधिकाºयांनी दिली.
सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये कामकाजाचा गोंधळ आहे. डॉक्टर, नर्स जागेवर नसतात, स्वच्छता व्यवस्थित केली जात नाही, अशी तक्रार जयश्री चव्हाण यांनी केली. त्यावेळी समक्ष पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाºयांनी स्पष्ट केले.मागील वर्षापासूनची प्रभागातील विकासकामे प्रलंबित असून चालू वर्र्षीच्या अंदाजपत्रकातील कामे अजून मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. अधिकाºयांनी तातडीने फायली निर्गत कराव्यात, अशी सूचना सत्यजित कदम, उमा इंगळे यांनी केली. यावेळी प्रतिज्ञा निल्ले, कविता माने यांनीही चर्चेत भाग घेतला.‘लोकमत’च्या वृत्ताची चर्चा‘लोकमत’ने शहरातील वाहतुकीची कोंडी या विषयावर गेल्या काही दिवसांपासून लिखाण करून महापालिका व पोलीस प्रशासनाने लक्ष वेधले आहे. त्यातच शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानकावरील वाहतुकीची कोंडी, हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण, अस्ताव्यस्त पार्किंग या विषयावर वृत्त प्रसिद्ध केले. त्याचेच पडसाद स्थायी समितीत उमटले.