कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईपुढे कोणी मोठे नाही, मंदिरातील मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाच्या कामात आडकाठी करू नका, तुमचे १० फूट अतिक्रमण तातडीने हटवून घ्या, अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने ते हटवू, असा इशारा बुधवारी शिवसेनेने माउली लॉजच्या मालकांना दिला. यावेळी मालक रमेश आंबार्डेकर यांनी भागीदार यांच्याशी चर्चा करून सोमवारपर्यंत निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली.अंबाबाई मंदिराच्या परिसरात सध्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मनकर्णिका कुंडाच्या खुदाईचे काम सुरू आहे. वास्तुरचनेचा अलौकिक नमुना असलेल्या या कुंडाच्या १० फूट जागेवर माउली लॉजचे अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण हटवून कुंडाच्या उत्खननासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले होते. मात्र, मालकांनी या बाजूकडील खुदाईवर न्यायालयातून स्थगिती आणली आहे.
देवस्थान समितीने ही बाब पत्रकार परिषदेद्वारे प्रकाशात आणल्यानंतर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या वतीने बुधवारी मालकांना जाब विचारण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, अंबाबाईपेक्षा कोणी मोठे नाही, लॉजचे लायसन्स, कंप्लिशन सर्टिफिकेट, बांधकाम परवाना यापैकी कोणत्याही बाबी पूर्ण नाहीत, शिवाय अतिक्रमण झाल्याचे मोजणीत निदर्शनास आले आहे. तरी तातडीने कुंडाच्या खुदाईसाठी सहकार्य करत अतिक्रमण हटविण्यात यावे, अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने ते हटवू.यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, नरेश तुळशीकर, अभिजित भुकशेठ, स्मिता सावंत, दीपाली शिंदे, पुष्पा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.कन्नड फलक हटविले..माउली लॉजसह परिसरातील काही यात्री निवास, धर्मशाळांवर लावण्यात आलेले कन्नड भाषेतील फलक फाडून टाकण्यात आले. काहीना काळे फासण्यात आले. महाराष्ट्राची सीमा ओलांडल्यावर एकही फलक मराठीत दिसत नाही, कोल्हापुरात राहून येथे कन्नड फलक लावण्याचे कारणच काय, मराठी भाषेचा अभिमान आहे की नाही, अशी विचारणा करत हे फलक फाडून टाकण्यात आले. कोल्हापुरात ज्या दुकानांवर कन्नड फलक दिसतील, ते फाडले जातील, असेही संजय पवार यांनी बजावले.