संजय नगर / सांगली : महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी नगरसेवक अभिजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली चौकात सांगली स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्याखाली महाआघाडी सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. हुकूमशाही लॉकडाऊन हटवा, लघुउद्योग लॉबी वाचवा, न्याय हवा, आमचे जगणे सोपे करा, मग लॉकडाऊन करा. अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.सांगली जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय कृती समिती सदस्यांच्यासोबत कोरोना, लॉकडाऊन, नागरिकांचे प्रश्न, रोजगार, आरोग्य सुविधा, हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार, रेशनिंग, नागरिकांच्या दैनंदिन गरजा, लाईट बिल आणि अन्य कर याबाबत सविस्तर मिटिंग घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.लॉकडाऊन करावे लागल्यास नागरिकांच्या दैनंदिन गरजा, रेशनिंग, लाईट बिल, सर्व शासकीय कर, कर्जाचे हप्ते आणि त्यावरील व्याज, संपूर्ण औषधोपचार खर्च, संपूर्ण शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करण्यात यावी, जितक्या दिवसासाठी लॉकडाऊन असेल तितक्या दिवसांसाठी त्याच्या कुटुंबाच्या संख्येनुसार आवश्यक वेतन, त्या त्या कुटुंबाच्या आधार संलग्न खात्यावरती जमा करण्यात यावे, जिल्ह्यातील त्या त्या भागात असणारे जनरल दवाखाने चालू ठेवण्याबाबत आदेश देण्यात यावेत, या काळात सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येऊन त्याच वेतनाचा वापर कोरोना काळातील उपाय योजना साठी करण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.लॉक डाऊन रद्द करावे या मागण्यासाठी नगरसेवक अभिजीत भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अक्रम शेख, साहिल खाटीक, आयुब पटेल, लाल मिस्त्री, जोद शेख आदी उपस्थित होते.