लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अनलॉकमध्ये सरसकट सर्वच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी बुधवारी शहर आणि उपनगरांतील व्यापाऱ्यांनी ‘लॉकडाऊन हटवा, व्यापाऱ्यांना वाचावा’ यासह विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन लक्ष वेधले. दुकानदारांनी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने आंदोलन झाले.
अत्यावश्यक सेवेची आणि वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने सुरू करण्यास अजूनही सरकारने परवानगी दिलेली नाही. याविरोधात व्यापाऱ्यांत नाराजी आहे. शहरातील सर्वच व्यवसाय, दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांची आहे. या मागण्यांसंबंधीचे फलक हातात घेऊन भाऊसिंगजी रोड, गुजरी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पानलाईन, बाजार गेट, शिवाजी मार्केट, शाहूपुरी, धान्य लाईन, पार्वती टॉकीज चौक, बागल चौक, महापालिका चौक, लक्ष्मी रोड, सुभाष रोड, बिंदू चौक, आराम कॉर्नर, शिवाजी चौक, राजारामपुरी मेन रोड अशा शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील एक हजार ते १२०० व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले. आपल्या दुकानाच्या दारात फलक हातात घेत कोणत्याही घोषणा न देता लॉकडाऊन हटवून सरसकट सर्व व्यापार करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. शिवाजी रोडवरील भांडी व्यापाऱ्यांनी हातात मागण्यांचे फलक घेऊन मानवी साखळी केली होती. राजारामपुरी येथे चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी दुकानासमोरच मानवी साखळी केली होती.
चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर, राजू पाटील, खजिनदार हरीभाई पटेल, माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीप कापडिया, संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे, संपत पाटील, राहुल नष्टे, भरत ओसवाल, माजी नगरसेवक तौफीक मुल्लाणी, संभाजीराव पोवार, कुलदीप गायकवाड, जुगल माहेश्वरी, विक्रम निसार, सुधीर आगरवाल यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. दरम्यान, मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.
--------------
चौकट
सर्वच असोसिएशनचा पाठिंबा
दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन, सराफ व्यापारी संघ, कापड व्यापारी संघ, किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन, दि शाहूपुरी मर्चंटस् असोसिएशन, डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंटस् असोसिएशन, डिस्ट्रिक्ट केमिस्टस् असोसिएशन, चुडी मर्चंटस् असोसिएशन, ऑईल मिल्स असोसिएशन, जिल्हा टिंबर व्यापारी व लघु औद्योगिक संघ, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, ऑटोमोबाईल्स डिलर्स असोसिएशन, प्लायवूड डिलर्स असोसिएशन, जिल्हा फुटवेअर्स असोसिएशन, स्टोन ट्रेडर्स असोसिएशन, कांदा-बटाटा व्यापारी असोसिएशन, दि कोल्हापूर ग्रेन कॅन्व्हासिंग एजंट असोसिएशन, कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ कोल्हापूर, आय. टी. असोसिएशन ऑफ कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र परिसर राईस मिल ओनर्स असोसिएशन, राईस मिल ओनर्स असोसिएशन, डिस्ट्रिक्ट स्पेअर पार्टस् अँड ऑटोमोबाईल्स डिलर्स असोसिएशन, कोल्हापूर रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन, गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशन, कोल्हापूर-कराड-सांगली शुगर मर्चंटस् असोसिएशन, असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेनर्स, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ, दि कन्झ्युमर्स प्रोडक्टस् डिस्ट्रिब्यूटर्स वेलफेअर असोसिएशन, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स, कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशन, रेडिमेड गारमेंट डिलर्स असोसिएशन, कोल्हापूर स्टेशनरी कटलरी असोसिएशन या संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला.