जयसिंगपूर : येथील शाहूनगर जय महाराष्ट्र चौक ते शाळा नं. ९ येथील राजर्षी शाहू चौकापर्यंतच्या रस्त्याच्या मध्यभागी असणारे विद्युत खांब काढावेत, अशा मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. अपघातास आमंत्रण देणारे हे विद्युत खांब लवकरात लवकर काढावेत, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी यावेळी दिला.
निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्याला रोड डिव्हायडर नसल्यामुळे विद्युत खांब खुलेच आहेत. हे खांब रात्रीच्या वेळी दिसत नसल्यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. अपघातामुळे बरेच खांब वाकलेले आहेत. खांबावरील रस्त्याच्या कडेला लावलेले डी.पी.चे दरवाजे खुलेच असतात. त्यामुळे लहान मुले व नागरिकांच्या जीवितास हानी होण्याची शक्यता आहे. त्याकडे तातडीने लक्ष देऊन दरवाजे दुरुस्त करुन घ्यावेत. तसेच अंडरग्राऊंड विद्युत वाहिनीचे कामकाज पूर्ण होऊन चार वर्षाचा कालावधी झाला आहे. तरीही अंडरग्राऊंड विद्युत वाहिनी सुरु करण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी असलेले खांब काढलेले नाहीत. त्यामुळे हे विद्युत खांब हटवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनावर सागर मादनाईक, शंकर नाळे, राजेंद्र सुतार, हर्षवर्धन कुन्ने, अमोल पाटील, विजय नलवडे, अक्षय बाबर, संतोष सावंत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.