राजाराम कांबळे- मलकापूर -शाहूवाडी तालुक्यात बीएसएनएल सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. मोबाईलना रेंज मिळत नाही, तर दूरध्वनीला सुरळीत सेवा मिळत नाही. कार्यालयातील खुर्च्या रिकाम्याच असल्याने तक्रार करण्यासाठी अधिकारीही उपलब्ध नाही. हे कार्यालय कशासाठी व कोणासाठी सुरू आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला असून बीएसएनएलच्या सेवेला कंटाळून ग्राहक इतर खासगी कंपन्यांकडे वळू लागला आहे. विशाळगड, शित्तूरवारुण, उदगिरी, येळवणजुगाई, आदी परिसरातील गावांतील नागरिकांनी बीएसएनएलला रामराम ठोकला आहे.शाहूवाडी तालुक्यात बीएसएनएलचे १७ एक्स्चेंज अंतर्गत सहा हजारांवर दूरध्वनी आहेत. तालुक्यातील बहुतांश लोक मुंबई येथे तसेच सैन्यदलात आहेत. मात्र, बीएसएनएल सेवा ग्राहकांना वेळेत मिळत नाही. याकडे येथील अधिकारी व कामगार ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. मलकापूर येथे तालुका अंतर्गत एक्स्चेंज आहे. मोबाईल ही सेवा अत्यावश्यक सेवा बनली आहे. प्रत्येक नागरिकाला फोनसेवा, फॅक्स, इंटरनेट, आदी सुविधा गरजेच्या बनल्या आहेत. मात्र बीएसएनएल सेवेमुळे नागरिक, व्यापारी हैराण झाले आहेत. तक्रार करूनदेखील न्याय मिळत नाही. विरळे परिसरात रेंजचा पत्ताच नाही. मात्र, सर्वत्र दूरध्वनी सेवेचे टॉवर दिमाखात उभे आहेत. उदगिरी गावातील नवीन टॉवर गेली पाच वर्षे बंद आहे. गावा-गावांतील नागरिकांनी आपले घरगुती फोन संबंधित कार्यालयाकडे जमा केले आहेत. हे ग्राहक खासगी कंपन्यांकडे वळत आहेत.मलकापूर मंडल कार्यालयात गेली तीन महिने कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असताना देखील वरिष्ठ अधिकारी इकडे फिरकलेले नाहीत. नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जाते. येथे असणारे कर्मचारीदेखील नागरिकांना नीट उत्तरे देत नसल्याच्या तक्रारी आहेत. तक्रारींचा ओघयेथील उपमंडल अधिकारी यांची बदली कोल्हापूरला झाल्याने हे पद रिक्त आहे, तर इतर कर्मचारी यांच्या बदल्या झाल्याने सर्व पदे रिक्त आहेत. सध्या या कार्यालयाकडे एक अधिकारी, एक लिपिक, शिपाई व एक टेक्निशियन उपलब्ध आहे. अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे या कार्यालयाचा बोजवारा उडाला आहे. ४मलकापूर येथील एका खासगी लाईनमनवर या कार्यालयाचा कारभार सुरू आहे, तर ग्रामीण भागात ही सेवा पूर्णत: बंद आहे. दररोज तालुक्यातून नागरिकांचा तक्रारींचा ओघ सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी जाणूनबुजून येथे बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी पाठवीत नाहीत. हे कार्यालय कोल्हापूर येथे स्थालांतरित करण्याचा अधिकाऱ्यांचा घाट असल्याची चर्चा सुरू आहे.
मलकापूर कार्यालयात ‘बीएसएनएल’ सेवेचा बोजवारा
By admin | Published: September 23, 2014 9:43 PM