राजाराम कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्क --मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात बहुसंख्य शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदाची संख्या मोठी आहे. त्यामुळे विकासकामे राबविताना अधिकाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जागा भरण्यासाठी शासन यंत्रणा ढिम्म असून, लोकप्रतिनिधी या प्रश्नी आवाज उठविताना दिसत नाहीत. रिक्त जागांमुळे कामाचा बोजवारा उडाला आहे. तालुक्यात बारा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यापैकी पशुवैद्यकीय अधिकाºयांची सहा पदे गेल्या सात वर्षांपासून रिक्त आहेत. परिणामी योग्य उपचाराअभावी पशुधन धोक्यात येत आहे. बांबवडे, भेडसगाव, आंबा, माण, मांजरे, करंजपेण, परळे निनाई, शित्तूर, वारूण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तर मलकापुरात ग्रामीण रुग्णालय आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या सतरा जागांची आवश्यकता असताना त्यापैकी दोन कत्रांटी, तर पाच कायमस्वरूपी डॉक्टर आहेत. दहा जागा रिक्त आहेत. तरीदेखील आरोग्य विभागाचे काम चांगले आहे. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, तर डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २७४ प्राथमिक शाळा आहेत. या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी गटशिक्षणधिकारी पद महत्त्वाचे आहे; मात्र हे पद गेली दोन वर्ष रिक्त आहे. विस्तार अधिकार यांची चार, तर केंद्रप्रमुखांची बारा, अध्यापकांची ६२ पदे रिक्त आहेत. शाहूवाडी तहसील कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठी आहे. याचा परिणाम कामावर होत असून, नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. शाहूवाडी पोलीस ठाण्याचा कारभार फक्त ४५ पोलिसांवर अवलंबून आहे. तालुक्यात दोन लाखांच्या जवळपास लोकसंख्या असताना, पोलीस संख्या कमी आहे. पोलीसपाटलांची २३ पदे रिक्त आहेत. १ शाहूवाडी पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागाकडे गेली दोन वर्षे बाल विकास अधिकारीपद रिक्त आहे, तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे आहेत. २ तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा आहेत. मलकापूर, बांबवडे, माण, आंबा, करंजफेण, भेडसगाव, सोंडोली, सरूड, नांदगाव अशा शाखा आहेत. या शाखांमध्येदेखील पूर्ण क्षमतेने कर्मचारीवर्ग नाही. काही शाखांत तीन कर्मचाºयांवर कारभार चालत आहे. ग्राहकांचा वेळेचा अपव्यय होत आहे. ३ १४२ महसुली गावे, २२५ वाड्यावस्त्यांसाठी केवळ २९ तलाठी कार्यरत आहेत. तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील रिक्त पदांची संख्या भरणे अत्यावश्यक आहे, तरच कामांचा उरक होईल व नागरिकांना होणारा त्रास कमी होईल.
शासकीय कार्यालयात रिक्त जागांमुळे कामाचा बोजवारा
By admin | Published: May 10, 2017 12:17 AM