‘लोकमत’ सखी मंचचे आयोजन : महिलांनी शिकली केकची रेसिपी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कुटुंबातील लहान-मोठ्यांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, एखादे सेलिब्रेशन असले की केक लागतोच; पण तो घरी स्वत: बनवला असेल, तर सेलिब्रेशनचा आनंद द्विगुणीत होतो. ख्रिसमसच्या औचित्याने महिलांच्या या इच्छेला मूर्त रूप देत ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने शुक्रवारी ‘केक वर्कशॉप’ घेण्यात आला. यात पाककला तज्ज्ञ व उज्ज्वलाज कुकिंग क्लासेसच्या उज्ज्वला भोसले यांनी बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत केकचे दहा प्रकार महिलांना शिकवले.
स्टेशन रोडवरील अविक कॉम्प्लेक्स येथे सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत झालेल्या या वर्कशॉपमध्ये उज्ज्वला भोसले यांनी रेड वेल्वेट केक, फाऊंडन्ट केक, डॉल केक, वेडिंग डबल लेअर केक, बास्केट फ्रूट केक, जेल केक, टायगर प्रिंट केक, मिरर केक, फोटो प्रिंट केक, रोझ हनी केक असे केकचे दहा प्रकार शिकवले. हे शिकवताना त्यांनी केकचे प्रिमिक्स कसे बनवायचे, त्यात कोणकोणत्या साहित्यांचा समावेश केला की केक छान होतो, फुलतो, सजावटीसाठीची व्हीप क्रिम कशी बनवायची, फ्लेवर कोणकोणते आणि कसे बनवायचे, केक हाताळताना-सजावट करताना कोणती काळजी घ्यायची, याबद्दल सविस्तर माहिती दिली. केवळ माहिती देऊन न थांबता तीन-तीन महिलांचे ग्रुप करून त्यांना केक बनवायला लावले. शिवाय प्रिंटेड नोट्सदेखील देण्यात आल्या. येथे वेलकम ड्रिंक आणि दुपारच्या जेवणाचीही सोय करण्यात आली होती.
--------
या कार्यशाळेत रेड वेल्वेट आणि फाऊंटन्ड पैठणी साडी केकचे खास आकर्षण होते. कार्यशाळा संपल्यानंतर सहभागी महिलांना केव्हीज फूडचे मालक रोहित कल्याणकर यांच्याहस्ते तयार केक बॉक्स, प्रमाणपत्र आणि केक प्रिमिक्सचे हमखास गिफ्ट देण्यात आले.
---
फोटो स्वतंत्र
--