श्रीकांत ऱ्हायकर ल्ल धामोडंमोहितेवाडी येथील विद्यार्थ्यांना जलाशयाच्या या तीरावरून पैलतीरावरचा एक किलोमीटरचा प्रवास करावा लागतोच; पण गेल्या दोन वर्षांपूर्वी यात थोडा बदल झाला, अन् तब्बल ३८ वर्षांनंतर या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा हा जीवघेणा जलप्रवास थांबला आहे.धरणासाठी गाव दिले... वडिलोपार्र्जित मिळकत धरणासाठी बहाल केली... स्वत:च्या संसारावर पाणी ओतून धरणग्रस्त नावाचा शिक्का कपाळी घेऊन तुळशी धरणाच्या निर्मितीनंतर केळोशी खुर्द या गावामध्ये गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या लोकांना विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे जलाशयाच्या वेगवेगळ्या तीरावर संसार थाटावा लागला. एवढ्यावरतीच या लोकांची परवड थांबली नाही, तर या गावातील लोकांना एकाच ग्रामपंचायतीत समाविष्ट करून शासनाने त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचेच प्रत्यंतर या लोकांना येत असून, त्याचा त्रास या लोकांना आजही सहन करावा लागतो. केळोशी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या मोहितेवाडी व केळोशी खुर्द या दोन गावांसाठी एकच शाळा आहे. इथे पहिली ते सातवीपर्यंतची शाळा असताना मात्र तुळशी जलाशयाच्या निर्मितीनंतर केळोशी खुर्द व मोहितेवाडी या एकाच गावातील लोकांना विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे दोन वेगवेगळ्या तीरावर राहावे लागले व यातून मोहितेवाडी व केळोशी खुर्द (कानकेकरवाडी) अशा दोन गावांची निर्मिती झाली. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची मोठी गोची निर्माण झाली. मोहितेवाडीतील विद्यार्थ्यांना जलाशयातूनच जीवघेणा प्रवास करून गेली ३८ वर्षे शिक्षण घ्यावे लागत आहे.या सर्व परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे होणारे हाल व त्यांच्या शिक्षणासाठी चाललेला रोजचा जीवघेणा प्रवास थांबविण्याच्या उद्देशाने प्रकल्प कार्यालय व या विभागाचे पंचायत समिती सदस्य व माजी सभापती जयसिंग खामकर यांच्या पुढाकाराने या मोहितेवाडी गावासाठी स्वतंत्र बालवाडी सुरू करण्यात आली. त्यामुळे पालकांसह गावकऱ्यांनी उत्साहात हा वर्ग सुरू करून या विभागाचे व जयसिंग खामकर यांचे आभार मानले. गावकऱ्यांचा त्रास कायमबालवाडीने जरी विद्यार्थ्यांच्या किमान गरजा पूर्ण झाल्या असल्या, तरी अद्याप दैनंदिन व्यवहाराच्या गोष्टींसाठी येथील पुरुष अथवा महिला वर्गाला जीव मुठीत घेऊनच गावकऱ्यांनी तयार केलेल्या जलाशयावरील तराफ्यावरूनच केळोशी खुर्द गावी जावे लागते. या रोजच्या जीवघेण्या प्रवासातून जरी विद्यार्थी वर्गाची सुटका झाली असली, तरी गावकऱ्यांना मात्र हा त्रास सहन करावा लागतो आहे. तो कधी संपणार, याचीच उत्सुकता गावकऱ्यांना लागून राहिली आहे.
जीवघेण्या ‘जलप्रवाहातून’ बालकांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2016 12:07 AM