कोल्हापूर : फ्लिपकार्ट कंपनीशी संलग्न असलेल्या इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस लॉजिस्टिक कंपनीला डिलिव्हरी बॉयने ७ लाख २४ हजार ४५६ रुपयांचा गंडा घातला. १ जानेवारी २०२१ ते ५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत त्याने कंपनीच्या कार्यालयीन यंत्रणेत वस्तूंच्या नोंदीमध्ये फेरफार करून ४५२ वस्तू परस्पर ग्राहकांना विकल्या.याबाबत कंपनीचे मॅनेजर कपिल अशोक रोटे (वय ३८, रा. बाहुबली, ता. हातकणंगले) यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी डिलिव्हरी बॉय यासिन कलंदर नदाफ (२४, रा. शाहूनगर झोपडपट्टी, जयसिंगपूर) याला अटक केली. दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्ट कंपनीशी संलग्न असलेली इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस लॉजिस्टिक कंपनी कोल्हापूरसह परिसरात कंपनीच्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवून त्याचे पैसे जमा करण्याचे काम करते. या कंपनीत यासिन नदाफ हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत होता. कंपनीची कार्यपद्धती लक्षात घेऊन विशाल संजय लोहार (२३, रा. जागृतीनगर, कोल्हापूर) या साथीदाराच्या मदतीने त्याने फ्लिपकार्टकडून आलेला माल कागदोपत्री कंपनीत आल्याचे आणि तो संबंधित ग्राहकांपर्यंत पोहोचवल्याचे नोंदवले.प्रत्यक्षात त्या ४५२ वस्तू परस्पर ग्राहकांना पोहोचवून त्याचे पैसे स्वत:कडे ठेवले. दोघांनी १० महिने अशी फसवणूक करून कंपनीला ७ लाख २४ हजार ४५६ रुपयांचा गंडा घातला. कंपनीच्या आर्थिक तपासणीत हा प्रकार लक्षात येताच मॅनेजर कपिल रोटे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांनी संशयित आरोपी यासिन नदाफ याला मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून अटक केली.साथीदाराचा शोध सुरूनदाफ याचा साथीदार विशाल लोहार अद्याप पसार आहे. फसवणुकीत त्याचाही महत्त्वाचा सहभाग होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो पळून गेला. त्याचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी क्रांती पाटील यांनी सांगितले.
कोल्हापुरात डिलिव्हरी बॉयने परस्पर विकल्या वस्तू; फ्लिपकार्ट संलग्न कंपनीला सव्वासात लाखांचा घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 16:37 IST