कोल्हापूर : कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर या औषधासाठी चार दिवसात तब्बल चार हजारांच्या संख्येत मागणी आली आहे. मात्र या चार दिवसात ७०० इंजेक्शनचा पुरवठा करणे शक्य झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाकडे यासाठी येणाऱ्या नागरिकांची व हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांची गर्दी होत आहे.
राज्यात कोरोनाची लाट आली असून कोल्हापूर जिल्ह्यातील बाधितांची संख्याही शेकड्यांनी वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवरही ताण वाढला असून बाधितांवरील उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिविर या इंजेक्शनला अचानक मागणी वाढली आहे. या औषधाची साठेबाजी होऊ नये व वितरणात गैरप्रकार होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून त्यावर अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांची व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
गेल्या चार दिवसात या कक्षाकडे रेमडेसिविरच्या तब्बल चार हजार इंजेक्शनची मागणी नोंदवण्यात आली असून केवळ ७०० इंजेक्शनचा पुरवठा करणे शक्य झाले आहे. नोंदणीनंतर खरंच इतक्या इंजेक्शनची गरज आहे का याची तपासणी करून जिल्ह्यातील १० पुरवठादारांकडे त्याची मागणी केली जाते. हे नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू असून केवळ हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून आलेली मागणी नोंदवली जात आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वरूपातील मागणीची येथून पूर्तता करण्यात येत नाही. तरीही अनेक नागरिक येथे गर्दी करत आहेत.
---
रेमडेसिविरऐवजी अन्य औषधे गोळ्यांवरही बरे होऊ शकणाऱ्या रुग्णांसाठीही हेच इंजेक्शन मागितले जात आहे, अनेकदा डॉक्टरांकडून तसेच रुग्णांकडूनच या उपचाराची मागणी केली जात असल्याचा या कक्षाचा अनुभव आहे.
---