प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या महिन्यात थैमान घातलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासन निकषांनुसार जिल्ह्यात ४८३ कोटी ८५ लाख रुपयांची मदतीची मागणी जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यातील सुमारे १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून जिल्ह्यात आले असून, त्याचे वाटप सुरू आहे; तर शेतीच्या झालेल्या नुकसानीसाठी सुमारे १२३ कोटींची मागणी केली जाणार आहे.नुकसान प्रचंड प्रमाणात झाले असले तरी विविध निकषानुसार त्यातील एवढीच रक्कम मागणी केली जाणार आहे.त्यातील किती उपलब्ध होते हा त्यापुढील प्रश्न आहे. त्यामुळे नुकसान लाखात आणि मिळणार शेकड्यात असे होण्याची शक्यता आहे. महापुरामुळे शेती, व्यापार, घरे, गोठे, पशू, आदींसह विविध घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे; परंतु शासन निर्णय व निकषाप्रमाणे शेती, व्यापारी, घरे यांसाठी शासनाकडून आर्थिक मदतीकरिता रक्कम मागणी केली जाणार आहे. याचे काम जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर अंतिम टप्प्यात आले आहे. एकूण सुमारे ४८३ कोटी ८५ लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी करण्यात येणार आहे. असे असले तरी शासन निर्णयानुसार मागणीप्रमाणे यातील १०७ कोटी यापूर्वीच सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून जिल्ह्णात आले आहेत. ही रक्कम सोडून उर्वरित नुकसान झालेल्या घटकांसाठी आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी निकषानुसार ३४ कोटी ४६ लाख ५४५ रुपयांची मागणी केली जाणार आहे. सर्वाधिक करवीर तालुक्यात (कोल्हापूर शहरासह) ११ कोटी ७५ लाख रुपये, हातकणंगले तालुक्यात सहा कोटी ३८ लाख, शिरोळ तालुक्यात १० कोटी ३२ लाख रुपये इतकी मागणी आहे. त्याचबरोबर पुरात मृत झालेल्या शेळ्या, मेंढ्या, म्हशी, गाई, बैले यांच्यासाठी दोन कोटी, मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीसाठी चार कोटी, पूरकाळात वापरलेल्या इंधनासह वाहने व बोटींवरील खर्चापाटी एक कोटी नऊ लाख रुपये, पूरबाधित क्षेत्रातील स्वच्छता, दुरुस्तीसाठी आठ कोटी रुपये मागणी करण्यात येणार आहे.पुरातील जीवितहानीसाठी मदतीकरिता ५३ लाखांची मागणी आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.शेतीच्या नुकसानीसाठी १२४ कोटीपुरामुळे उसासह विविध शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी निकषानुसार १२३ कोटी ९९ लाखांची मागणी केली जाणार आहे. पुरामुळे पडलेल्या कच्च्या व पक्क्या घरांसह गोठे यासाठी ११० कोटीं, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या इमारतींसह रस्ते, वीज, पोलीस ठाणे, महापालिका यांच्यासाठी १३४ कोटी रुपयांची मागणी केली जाणार आहे.
महापूर नुकसानीपोटी ४८४ कोटींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:44 AM