कसबा तारळे :
चुकीचे उपचार व हलगर्जीपणामुळे पती व सासरे यांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप करून डॉ.शिवाजी दत्तात्रय पाटील(सध्या रा. बोरवडे, ता कागल) यांच्यावर कारवाईची मागणी कुडुत्री (ता. राधानगरी)येथील प्रियांका मनोहर चौगले यांनी राधानगरी पोलिसांकडे अर्जाद्वारे केली आहे.
अर्जात पुढे म्हटले आहे की, माझे पती एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीस होते. लॉकडाऊन दरम्यान आम्ही पुण्याहून मूळ गावी कुडुत्री(ता.राधानगरी) येथे आलो.त्यानंतर त्यांचे काम घरातूनच सुरू होते.२० एप्रिल रोजी माझे सासरे पिराजी चौगले यांना ताप,सर्दी व खोकला असा त्रास जाणवू लागल्याने गावी वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. शिवाजी दत्तात्रय पाटील यांच्या कसबा तारळे येथील दवाखान्यामध्ये त्यांना दाखविले. तेथे त्यांनी औषधोपचार चालू केले. दुसऱ्या दिवशी पती मनोहर यांना देखील तसाच त्रास सुरू झाला म्हणून त्यांचीही तब्येत त्याच डॉक्टरांना दाखविली व त्यांच्यावरही औषधोपचार चालू केले. दोघांच्या प्रकृतीमध्ये २६ एप्रिलपर्यंत काहीच फरक पडला नाही म्हणून डॉ.पाटील यांच्या सूचनेनुसार कोल्हापुरातील एका खासगी लॅबमध्ये दोघांचीही कोरोनाची चाचणी केली असता ते दोघेही पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर डॉ.पाटील यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या संबंधित कोल्हापुरातील एका खासगी दवाखान्यात त्यांना उपचारासाठी दाखल केले.
उपचारादरम्यान ११ मे रोजी पती मनोहर यांचे निधन झाले व १५ मे रोजी सासरे पिराजी चौगले यांचे निधन झाले. आठवडाभर कोरोनाची चाचणी न करता स्थानिक पातळीवर डॉ.पाटील उपचार करीत राहिले आणि त्यानंतरही आमच्या म्हणण्याप्रमाणे तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे उपचार न करता आपल्या मर्जीतील एका दवाखान्यात उपचार करण्यासाठी दोघांना दाखल केले. परिणामी कोरोनाचा आजार बळावला व दोघांचाही मृत्यू झाला. डॉ.पाटील यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक ज्ञान, शिक्षण नसल्याचेही आम्हाला समजले आहे. या दोघांच्या मृत्यूस डॉ. पाटील यांचा हलगर्जीपणा, बेफिकीरपणा व चुकीचे औषधोपचार कारणीभूत असल्याचा आमचा आरोप आहे.
पती व सासऱ्याच्या निधनामुळे आमचे मोठे कौटुंबिक,आर्थिक नुकसान होऊन आम्हाला मानसिक धक्का बसला आहे. डॉ.पाटील यांची कृती गुन्ह्याच्या स्वरूपाची असल्याने त्यांच्याविरुद्ध विविध कायद्याखाली गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी प्रियांका चौगले यांनी केली आहे.
------------------------------------------------