कोल्हापूर : शिंगणापूर येथील चौदाव्या वित्त आयोगातील २ लाख ३५ हजार रुपयांचा निधी लॉकडाऊनच्या काळात सरपंच प्रकाश रोटे, ग्रामसेविका, कंत्राटदार यांनी परस्पर हडप केल्याची तक्रार बौद्ध समाजाने केली आहे. शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.
गावातील २०१७/१८ मध्ये समाजमंदिर सुशोभिकरणासाठी २ लाख ३५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. फेब्रुवारी २०२० मध्ये हे काम कसे करायचे याची चर्चाही झाली. लाॅकडाऊनमुळे काम सुरू झाले नाही; परंतु नंतर याबाबत ग्रामसेविका कविता जाखलेकर यांना धारेवर धरताच हा निधी खर्च केल्याचे सांगितले. २८ डिसेंबर रोजी करवीर पंचायत समितीकडे याबाबत तक्रार करूनही काही चौकशी झाली नाही म्हणून सर्वांनी चव्हाण यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. शिष्टमंडळात भाजप मागासवर्गीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस दत्ता आवळे, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब कांबळे, अनिल धनवडे, बाबासाहेब धनगर, विजय कांबळे, तुषार कांबळे यांचा समावेश होता.