कोल्हापूर : कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तसेच कोविड संसर्ग टाळण्याचा एकही नियम न पाळता लोटस प्लाझा अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या साई होम मल्टिस्पेशालिटी ॲन्ड रिसर्चमधील कोविड सेंटरवर कारवाई करा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी बुधवारी केली. महापालिकेकडे या रुग्णालयाची नोंदणी नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
काही संघटनांचे पदाधिकारी आम्हाला जाणीवपूर्वक मानसिक त्रास देत आहेत. हा आमचा इलाखा असल्याचे सांगून सेटलमेंटची भाषा करतात. आमचे रुग्णालय अधिकृत असून नोंदणी झालेले आहे. रुग्ण आल्यानंतर उपचार करणे आमचे कर्तव्य असते. तो कोराेनाचा आहे की अन्य कशाचा रुग्ण आहे, हे उपचार सुरू झाल्यानंतरच कळते. महापालिका प्रशासनाकडे कोविड सेंटरची परवानगी मागितली असली तरी त्यांच्याकडून ती प्रलंबित असल्याचे या रुग्णालयाचे डॉ. राहुल गणबावले यांनी सांगितले.
व्हीनस कॉर्नरजवळील 'लोटस प्लाझा' अपार्टमेंटमध्ये साई होम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. मुळात होमिओपॅथी उपचार पद्धतीचा फलक लावून प्रत्यक्षात कोविडच्या गंभीर रुग्णांवर येथे उपचार सुरू आहेत. येथील डॉक्टर, कर्मचारी किंवा रुग्ण कोविड प्रतिबंधक उपायांचा कोणताच वापर करताना दिसत नाहीत. डॉक्टरही विनामास्क रुग्णांवर उपचार करीत असतात. कोविडचे मृतदेह परस्पर नातेवाइकांकडे दिले जात आहेत. सेंटर सुरू झाल्यापासून एकदाही इमारतीचे निर्जंतुकीकरण केलेले नाही, असा नागरिकांचा दावा आहे.
भाजपचे शाहूपुरी मंडल अध्यक्ष आशिष कपडेकर, शीतल भंडारी यांनी पोलीस प्रशासन व महापालिकेकडेही तक्रारी केल्या आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेकडे पुन्हा तक्रार अर्ज दिला आहे.
या सेंटर चालकांवर सध्या लागू असलेल्या साथरोग नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे अन्यथा आम्ही महापालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी विष्णुदास दायमा, संजय पोतदार, हर्षराज कपडेकर, सनी पाटील, महेंद्र हंचनाळे उपस्थित होते.