बेळगाव : बेळगावात कर्नाटक प्रशासकीय आयोगाची स्थापना करावी या मागणीसाठी धरणे आंदोलन छेडलेले वकील आज, मंगळवारी आक्रमक झाले. निवेदन देण्यासाठी जाताना पोलिसांनी मुख्य गेट बंद केल्यामुळे वकिलांनी मागील बाजूने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करून लोखंडी गेट मोडले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात नव्हते. वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांंचा नामफलक काढला. जिन्यावर असणाऱ्या कुंड्यांची मोडतोडही वकिलांनी केली . सोमवारपासून बेळगाव जिल्ह्यातील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादाची बेळगावात स्थापना व्हावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन छेडले आहे. आज, मंगळवारी मागणीसंदर्भात निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने वकील जमले होते. पोलिसांनी गेट बंद केले होते. त्यामुळे गनिमी काव्याने वकील मागील बाजूने जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले आणि त्यांनी कुंड्या, नामफलकाची मोडतोड केली . नंतर निवासी जिल्हाधिकारी प्रविणकुमार यांनी वकिलांचे निवेदन स्वीकारले. वकील मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे पोलिसांना काहीच करता आले नाही. घटनेचे वृत्त कळताच डीसीपी अनुपम अगरवाल जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. वकिलांनी केलेल्या मोडतोडीची पाहणी केली. नंतर पोलीस बंदोबस्त वाढविला.
प्रशासकीय आयोगाची मागणी : जिल्ह्याधिकाऱ्यांचा नामफलक हटविला
By admin | Published: November 19, 2014 12:13 AM