कोल्हापूर : आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पांची मूर्ती दिव्यांगांच्या निरागस हातांमधून आकाराला आल्या आहेत. यंदा चेतनातील विद्यार्थ्यांनी २०० च्या वर, तर स्वयंम् शाळेतील विद्यार्थ्यांनी १०० गणेशमूर्ती साकारल्या आहेत. कोरोनामुळे यंदा मूर्तींची संख्या कमी झाली आहे. त्यातच या मूर्तींना सर्वाधिक मागणी असल्याने त्यांचे बुकिंग झाले आहे.
गणेशोत्सव चार दिवसांवर आल्याने घरोघरी सणाची तयारी सुरू झाली आहे. कुंभारवाड्यात कुंभार बांधवांची लगबग सुरू आहे; पण दिव्यांग विद्यार्थ्यांची गणेशमूर्ती तयार असून ती भाविकांच्या हाती सुपूर्द होण्यासाठी अधीर झाली आहे. दिव्यांग विद्यार्थी कुटुंबीयांवर अवलंबून असतात, आर्थिक भार उचलण्यात ते सक्षम नसतात, असा एक समज असतो; पण तो खोटा ठरवत शहरातील चेतना विकास संस्था, स्वयंम् मतिमंद मुलांची शाळा व जिज्ञासा या तीन शाळांमधील विद्यार्थी कार्यशाळेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले आहेत.
गणेशमूर्ती बनवणे हे तसे जिकिरीचे आणि बारीक कलाकुसरीचे काम. त्यात ती शाडूची किंवा कागदी लगद्यापासून बनवायची असेल, तर अधिक लक्ष देऊन करावी लागते. पण दिव्यांग विद्यार्थी अगदी पिढ्यानपिढ्यांपासून मुरलेल्या कुंभारांसारखे सफाईदारपणे ही मूर्ती बनवतात. गोळ्याल मूर्तीत रूपांतरित करत त्यावर बारीक नक्षीकाम, अवयव, दागिने, आयुधं इतके कौशल्याचे कामही ते छान पद्धतीने करतात. विशेष म्हणजे त्यांना स्वत:ला मोठा आनंद मिळतो.
---
यंदा कोरोनामुळे संख्या कमी
चेतनामध्ये २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी १०० विद्यार्थी हे कार्यशाळेत आहेत. येथे दरवर्षी ५०० च्यावर मूर्ती बनवल्या जातात, तर स्वयंममध्ये २०० हून अधिक मूर्ती तयार होतात, मात्र कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद असल्याने या उपक्रमालाही अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे मूर्तींची संख्या कमी झाली असली, तरी सगळ्या मूर्ती आता बुक झाल्या आहेत.
---
बाप्पांची परदेशवारीही...
चेतनामधील एक गणेशमूर्ती यंदा लंडनला गेली आहे. अन्य काही मूर्ती विशाखापट्टणम, पुण्याला गेल्या आहेत. शिवाय येथे मंडळांच्यादेखील ४ फुटांच्या मूर्ती बनवल्या जातात.
--------
फोटो नं ०४०९२०२१-कोल-चेतना
ओळ : कोल्हापुरातील चेतना संस्थेतील विद्यार्थ्यांनी बनवलेली गणेशमूर्ती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
---
०४०९२०२१-कोल-स्वयंम०१,०२
स्वयंम् शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेले गणेशमूर्ती.