ग्रामपंचायत निवडणूक या स्थानिक पातळीवर अत्यंत अटीतटीने लढविल्या जातात. यामध्ये भावकीबरोबरच गृहकलही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. अनेकवेळा एकाच घरातले दोन उमेदवार वेगवेळ्या विरोधी आघाडीतून रिंगणात उतरतात. तसेच या निवडणुका प्रभागानुसार होत असल्याने मर्यादित मतदार असतात. त्यामुळे एक-एक मतासाठी टोकाचा संघर्ष निर्माण होतो. याचे परिणाम म्हणून निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षे अनेकांना त्रास सहन करावा लागतो.
निवडणुकीत शासकीय कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान घेतले जाते. अशा मतांची प्रभागात एक किंवा दोन एवढीच संख्या असते. त्यामुळे मतमोजणी वेळी संबंधित कर्मचाऱ्याने कोणाला मतदान केले हे उमेदवार नियुक्त मतमोजणी प्रतिनिधीला समजण्याची शक्यता असते. तेथील स्थानिक शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याच करू नयेत आणि केल्या असतील तर त्या रद्द कराव्यात, अशी मागणी संबंधितांकडून होत आहे.