इचलकरंजी : आमदार महादेवराव महाडिक यांनी विधानपरिषदेसाठी कॉँग्रेसकडे उमेदवारी मागणे, हा मोठा विनोदच आहे. जिल्हा परिषद, कोल्हापूर महापालिका या निवडणुकीमध्ये महादेवराव महाडिक कोठेही नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून तिकिटाची मागणी हे आश्चर्यच आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री सतेज पाटील यांनी केले. इचलकरंजी येथे माजी मंत्री सतेज पाटील पत्रकारांशी बोलत होते.यावेळी माजी मंत्री पाटील हे विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असून, त्यांनी काही प्रमुख नेते व नगरपालिका सदस्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास माजी मंत्री सतेज पाटील यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा केली. आपण विधानपरिषदेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. यावेळी तेथे कॉँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रकाश सातपुते, शहर अध्यक्ष प्रकाश मोरे, पालिकेतील गटनेते बाळासाहेब कलागते, शहर उपाध्यक्ष विलास गाताडे, अशोकराव आरगे, आदी उपस्थित होते.विधानपरिषद निवडणुकीसाठी कॉँग्रेसकडून अनेक इच्छुक असले तरी पक्षश्रेष्ठी योग्य असाच उमेदवार देतील, असे सांगून पाटील म्हणाले, मी स्वत: कोल्हापूर महापालिकेची निवडणूक सुरू असताना जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांना भेटलो आहे. तसेच आता गडहिंग्लज, जयसिंगपूर, इचलकरंजी येथील प्रमुखांच्या गाठीभेटी घेत आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधला. ते बाहेरगावी असल्याने भेटू शकत नसल्याचे त्यांनी मला सांगितले. उमेदवारी मिळाल्यास मी जिल्हा परिषद सदस्य, तसेच नगरसेवकांच्या घरी जाऊन मला मतदान करण्याची विनंती करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सतेज पाटील यांनी शहर विकास आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांच्याही निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच ‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी ‘शविआ’चे निमंत्रक तानाजी पोवार, नगरसेवक प्रमोद पाटील, मदन झोरे, सयाजी चव्हाण, संतोष शेळके, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आवाडे-पाटील यांच्यात गुप्त चर्चाविधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रकाश आवाडे व सतेज पाटील हे दोघेही इच्छुक आहेत. पाटील यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन आवाडे पिता-पुत्रांची भेट घेतली. दोघेही इच्छुक असलेल्या उमेदवारांनी काहीवेळ स्वतंत्र चर्चा केली. या चर्चेबाबतचा तपशील मात्र समजू शकला नाही. त्यामुळे निवडणूक आणि उमेदवारी याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे.जयवंतराव आवळेंची भेटखोची : काँग्रेसचे माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या निवासस्थानी सतेज पाटील यांनी भेट देऊन आवळे यांना विधानपरिषदेला सहकार्य करण्याची मागणी केली. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व प्रदेश काँग्रेस कमिटीकडे उमेदवारी मिळण्याबाबत शिफारस करावी, अशी अपेक्षा सतेज पाटील यांनी आवळे यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजू आवळे उपस्थित होते.
महाडिकांकडून उमेदवारीची मागणी; मोठा विनोदच
By admin | Published: November 11, 2015 11:59 PM